वेळापूर : सोलापुरातील कोळेगाव (ता. माळशिरस) येथील कन्या व सध्या औरंगाबाद येथे शिक्षण घेत असलेल्या कु. श्वेता हनुमंत सावंत हिची राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली.
नुकतेच एमसीएतर्फे पुणे येथे झालेल्या मुलींच्या १९ वर्षांखालील संघ निवड चाचणीत श्वेताने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. १७ वर्षीय श्वेता ही डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. या वर्षी पुण्यात झालेल्या सदू शिंदे महिला टी – २० लीगमध्ये ७ सामन्यांत ३३८ धावा ठोकल्या. त्याचबरोबर ५ गडीदेखील बाद केले. ७ पैकी ६ सामन्यांत ती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुसरीकडे, धुळ्यात झालेल्या सामन्यात नाबाद ३५ व नाबाद ४८ धावांची खेळी केली होती. ती वाळूज येथील युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकादमीची खेळाडू आहे. ती प्रशिक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. प्रशिक्षक पाटील याविषयी सुराज्य डिजिटल बोलताना म्हणाले की, श्वेतामध्ये खूप गुणवत्ता आहे. ती भविष्यात निश्चित राष्ट्रीय संघाची सदस्य बनेल. तिच्यावर आतापासून महाराष्ट्राचे लक्ष आहे .
तिच्या या निवडीबद्दल बाबासाहेब सावंत,अक्षय सावंत,अमर सावंत यांनी अभिनंदन केले. तसेच विविध स्तरातून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.