सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी एकूण १ हजार १३५ शेतक-यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.
कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतक-यांना त्यांच्या मागणीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. त्यानुसार पात्र शेतक-यांना जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मंजूरी दिलेली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सभापती अनिल मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचित जातीमधील एकूण १८ नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे ९, वीज जोडणी आकार ३ कामे व विद्युत पंपसंच १५ असे एकूण ४५ शेतक-यांना रक्कम रुपये ५२ लाख ८० हजार रूपयांची मंजूरी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण ४ नवीन विहिर मागणी केलेल्या शेतक-यांना रक्कम रुपये १० लाख रूपये मंजूरी देण्यात आलेली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील एक विहिर दुरुस्ती कामांकरीता एकूण ५० लाभार्थी करीता रक्कम रुपये ६३.३० लाख रूपये मंजूरी देणेत आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे.
जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी या सर्व योजनाकरीता एकूण ३६ शेतक-यांना रक्कम रुपये ६९.७० लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे.आज अखेर एकूण ८६ शेतक-यांना रक्कम रुपये १ कोटी ३३ रूपयांची लाख मंजूरी देण्यात आलेली आहे.
कृषि विभागाकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शेतक-यांना विविध बाबीकरीता लाभ देण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध असून मंजूरी मिळालेल्या शेतक-यांनी तात्काळ कामे सुरु करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणेत आले आहे.
या योजने अंतर्गत लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या ३४५ शेतक-यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावीत. जेणेकरुन जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोयीचे होईल, असेही धोत्रे यांनी सांगितले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या अन्य गरजू शेतक-यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.