सोलापूर : महापालिकेतील प्रभाग १६ मधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संतोष भोसले यांनी आज पाणी प्रश्नी प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत सिनेस्टाईल आंदोलन केले. यावेळी भोसले यांनी अनेक आरोप केले.
आपल्या प्रभागात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे. हीच स्थिती शहरात सर्वत्र आहे. महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर बैठका होवून प्रशासन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत नाही. ऐन सणासुदीत लोकांना पाणी मिळत नाही. नागरिक लोकप्रतिनिधींवर टीका करत आहेत. अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. यंदा मुबलक पाऊस झाला, धरणात आणि बंधाऱ्यात पाणी असूनही शहरवासियांना चार दिवसाआड पाणी मिळत आहे, असं संतोष भोसले यांच म्हणणं आहे.
सणासुदीला शहरात सुरळीत पाणीपुरवठा करू अशी बैठक महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी घेतली, बैठक होवून पंधरा दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरळीत नाही. डेंग्यूचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही महापालिका प्रशासन निष्काळजीपणा करीत आहे. डेंग्यूमुळे लहान बालके मृत्यूमुखी पडले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवक असूनही मी मरायला तयार असल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी आज शनिवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
आज सकाळी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून आपण याप्रश्नी पाण्याच्या टाकीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं जाहिर केलं आणि ११ च्या सुमारास ते पोलीस आयुक्तालयासमोरील टाकीवर चढले. बराच वेळानंतर पोलीसांनी त्यांना खाली आणलं आणि पालिका आयुक्तांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचं सांगितलं. सत्ताधारी असुन आपण आंदोलन करत आहात असे पत्रकारांनी विचारले असता संतोष भोसले म्हणाले, सत्तेवर असून उपयोग काय? महापौरांसमोर चर्चा करुनही काहीच उपयोग होत नाही, हालचाली होत नाहीत. पाण्यावाचून शहरवासियांचे हाल होत असल्याचे सांगितले.
उजनीत मुबलक पाणी असतानाही नियोजन नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत नाही. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला तरच डेंग्यूचे प्रमाण कमी होणार आहे. लहान मुले डेंग्यूमुळे मरत आहेत. प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. चारचाकी वाहनात आरामात फिरणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बैठकीत असल्याचे कारण सांगितले जाते. कागदावर बैठका होतात. सत्ताधारी नगरसेवक असलो तरी आंदोलन करणार. सत्ताधाऱ्यांचा वचक नसल्यामुळेच अधिकारी राजकारण करत आहेत. आयुक्तांनीच सांगितले आहे की, सत्ताधाऱ्यांचे ऐकायचे नाही, असा आरोपही केले.