विरवडे बु : मोहोळ ते तेरामैल या राष्ट्रीय महामार्गावर कंदलगाव ते कोरवलीदरम्यान अंत्रोळी फाटा नजीक, इंडियन पब्लिकस्कूलसमोर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मालट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील कमल नानासाहेब म्हमाणे यांचा दुर्दैवी मृत्यू तर पती नानासाहेब दादा म्हमाणे हे गंभीर जखमी झाले आहेत.
कोरवली (ता. मोहोळ) येथील रहिवासी व सध्या सोलापूरस्थित नानासाहेब दादा म्हमाणे ( वय ६५) हे पत्नी कमल नानासाहेब म्हमाणे ( वय ६० ) यांच्यासह दुचाकी (क्रमांक एम.एच. १३ ए.वाय २८७५ ) वरून कंदलगाव मार्गे कोरवलीच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या मालट्रकने (क्रमांक एम. पी. ०९ एच.एच.१६३३) गतिरोधक वाचवण्याच्या नादात एक चाक रोडखाली घेवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कमलबाई नानासो म्हमाणे यांचे डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती नानासाहेब म्हमाणे यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने घोट्यापासून पाय तुटून गंभीर जखमी झाले.
अपघात करून भरधाव निघून जाणारा ट्रक तेरामैल चौक येथे कंदलगाव बीटचे पोलीस नाईक श्रीकांत बुरजे व वाहतूक पोलीस पवार यांनी पकडला. घटनेची माहिती समजताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतास शवविच्छेदन करण्यासाठी मंद्रूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले. जखमी पती नानासो म्हमाणे यांना उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात पाठण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील पतीचा पाय घोट्यापासून तुटून वेगळा झाला. तसेच घटनास्थळी रक्त मासांचा सडा पडला होता. मंद्रूप पोलिसांनी ट्रक चालक सुरजित सुबे सिंह (रा. रंजनपुर ता. सावेर जि. इंदोर मध्य प्रदेश) यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विश्वास पवार करीत आहेत.
* पारधी वस्तीवर पोलीस पथकाची धाड
मोहोळ : मोहोळ पोलीस पथकाने पारधी वस्तीवर चालु स्थितीत असणाऱ्या हातभट्टी दारूच्या भट्या उध्वस्त केल्या आहेत. काल शुक्रवारी, १७ सप्टेबर रोजी ही धाड टाकली.
या बाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भांबवेवाडी , कोंबडवाडी व सय्यद वरवडे परिसरात हातभट्टी दारुच्या भट्ट्या असल्याची माहिती मिळताच पो नि अशोक सायकर यांनी ०४ पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या पथकाला पाठवुन रेड केली टाकली. घटनास्थळावर १० प्लास्टीकचे बॅरलमध्ये गुळ मिश्रित रसायन अंदाजे ८०० ते ८५० लिटर रसायन व तयार गावठी अंदाजे ५० लिटर मिळून आले. ते सर्व जप्त माल जागीच सांडुन बॅरल फोडुन रसायन नाश केले. एक पुरुष व दोन महिला यांच्यावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करीत त्यांना सदर अवैध व्यवसायापासून परावृत्त होण्यासाठी व चांगला वैध व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले.