तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री आई तुळजाभवानी मातेच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणा-या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यास काल रविवारी पोलीसांनी अटक केली होती. त्यास आज सोमवारी तुळजापूर येथील न्यालयासमोर उभे केले असता सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दान पेटीवर दरोडा घालणारा तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यास गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले आहे. हा आरोपी शहरात वर्षभर उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस अटक करीत नव्हते, मात्र एसपीची बदली होताच पोलिसांना जाग आली आणि काल रविवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, नाईकवाडी यास न्यायालयात उभे करण्यात आले असता, सहा दिवसाची म्हणजे २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाईकवाडी यांनी ३५ तोळे सोने ७१ किलो चांदी व ७१ प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा नोंद केला होता.नाईकवाडी यांच्या १७ वर्षाच्या कालावधीत त्यानी टप्या, टप्प्याने पुरातन नाणी गायब केली आहेत. त्यामुळे या काळात त्यास कोण मदत केली? त्याचे साथीदार व सूत्रधार कोण? ही नाणी सध्या कुठे आहेत यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील अँड शिरीष कुलकर्णीमार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते.
मंदीर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक पदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान व भाविकांची फसवणूक केली. त्याच्या ताब्यात असलेल्या श्री तुळजा भवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रँम चांदीच्या वस्तु तसेच ७१ प्राचीन नाणी याचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केल्याची फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलीसांनी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409,467,468,471,381 भा.द.वी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांची बदली झाल्यानंतर श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांनी आदेश दिल्यावर रविवार १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.