चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांनी शपथ घेतली आहे. पंजाबच्या राजभवनमध्ये हा सोहळा पार पडला. राज्यपालांनी चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, चन्नी हे चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
चन्नी यांनी राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. चन्नी यांच्यासोबत काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओमप्रकाश सोनी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंजाब काँग्रेसकडून दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांना हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे म्हणत त्यांनी चन्नी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री म्हणून याची इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद होणार, संविधान आणि काँग्रेसच्या भावनेला नमन,’ असे सिद्धू यांनी ट्विट केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शपथविधीनंतर काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी राजभवनवर पोहचले. राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. चरणजीत चन्नी हे पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री झाले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या 150 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मी माझ्या हाताने नोकरी देऊ शकलो नाही, याचे मला दुःख आहे, असे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. नवीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी लवकरच या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरीचे पत्र देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अमरिंदर सिंग यांनी शनिवारी राजीनामा दिला होता.
चरणजित सिंग चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा सुरू आहे. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत.
राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चरणजित सिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.