सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी महागाई विरोधात निदर्शने केली.
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी व जीवनाश्यक वस्तूंची महागाई विरोधात आणि देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करणे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकारविरोधात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ कमी करा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, MSP चा कायदा करा, महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दर व महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईत सर्वसामान्य जनता होरपळत असून त्याचे चटके सहन करावे लागत आहे. याविरोधात अनेक वेळा आंदोलन केले. तरी जनतेचा आवाज ऐकून घेत नाहीत. याउलट देश अदानी अंबानी यांना विकत आहे, युवक बेरोजगार होत आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. शेतकरी संकटात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचे आवाज दाबला जातो, त्यांना गायब केले जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर प्रदेश मध्ये महंत गायब होत आहेत आत्ता पर्यंत पन्नास जण गडप झाले आहेत. जातीपातीच्या नावाखाली देशाचे वाटोळे करत आहेत. आमची संस्कृती गोरगरीब तळागाळातील जनतेचे, शेतकऱ्यांचे काम करणे त्यांच्या हितासाठी करत राहणार, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ची दरवाढ व महागाईमुळे लोक वैतागलेत त्यामुळे दरवाढ व महागाई ताबडतोब कमी करावी. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच असे ठणकावून सांगितले.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना अच्छे दिन चे महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली पण सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात आणि महागाई प्रचंड वाढविली. महिलांचा सन्मान करतो म्हणणाऱ्या मोदींनी गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांपर्यंत वाढविली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता भगिनी पुन्हा चुलीकडे वळत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असून तो आज मोदी सरकारमुळे मोडला आहे. त्याच प्रमाणे मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे केले ते रद्द झालेच पाहिजे. मन की बात करणारे मोदी सरकार जण की बात कधी करणार, म्हणून मोदी सरकारने महागाई लवकरात लवकर कमी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी करुन घोषणा दिल्या.
यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हा महिला अध्यक्ष, नगराध्यक्ष शाहीन शेख नगरसेवक तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका फिरदोस पटेल, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, मनिष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, अशोक कलशेट्टी, पंडित सातपुते, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अलसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, तालुका अध्यक्ष हरीश पाटील आदींसह कार्यकर्त्यांचा आंदोलनात समावेश होता.