मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ते मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडेही असतील, असे वृत्त होते. मात्र मुंडे यांनी शुक्रवारी आजारी असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तसेच पुढील 2 दिवस आराम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क बांधले जात आहेत.
नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्या या आजारपणावरुन काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “फडणवायसीस (Fadnaviasis) आजारातून पंकजाताई लवकर बऱ्या होवोत हीच सदिच्छा” असे उपरोधिक ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून आली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा केली आहे. वाशिममधून आपण तीन दिवसीय पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर स्थानिक प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही ते म्हणाले.