वळसंग : लोकमंगल बँकेने मला मागणीप्रमाणे तीस लाखाचे कर्ज न – देता तुझ्या सांगण्यामुळेच दहा लाख रुपयेच दिले. उरलेले वीस लाख रुपये तुच मला दे नाही तर तुला बंदुकीची गोळी झाडून किंवा तलवारीने वार करुन जीवे ठार मारीन, अशी धमकी भाजपा दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांना गावातीलच एका नागरिकाने दिली आहे. एवढच नाही तर त्यांने हातात तलवार घेवून त्यांच्या अंगावर धावत जावून मारण्याचा प्रयत्न ही केला आहे.
ही घटना होटगी गावात गुरुवारी रात्री घडली. रामप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी यांनी याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गावातील म्हाळप्पा श्रीमंत सोनकवडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चिवडशेट्टी हे शेतातून रात्री घराकडे जात असताना वाटेत त्यांना सोनकवडे याने अडवले व मला लोकमंगल बँकेने ३० लाखाची मागणी असताना १० लाख दिले हे सर्व तुझ्या सांगण्यामुळेच झाले. आता तु मला २० लाख रुपये दे अन्यथा तुला बंदूकीने गोळी घालून किंवा तलवारीने वार करून आज रात्रीतच मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर चिवडशेट्टी जेवण करून रात्री घराबाहेर बोलत थांबले असता म्हाळप्पा सोनकवडे हातात तलवार घेवून आला व मला २० लाख रुपये देण्याच काय झालं, असं म्हणत शिवीगाळ दमदाटी केली.
यावेळी त्यांच्याशी गप्पा मारत असलेले लोकांनी भांडण सोडावल. यावेळी परत जातानाही सोनकवडे यांने तुला याच तलवारीने जीवे मारल्या शिवाय सोडणार नाही, अशी पुन्हा धमकी दिली असं फिर्यादीत म्हंटलयं. रामप्पा चिवडशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक समजले जातात.
* फर्निचर खरेदी वरुन दोन लाखाला फसवले
सोलापूर : फर्निचर विकण्यासंबंधी ओएलएक्स ॲप वर जाहिरात पाहून फर्निचर खरेदी वरून तरुणास दोन लाखाला फसवल्याची घटना ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सुशांत वीरेंद्र गांधी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोबाईल क्रमांक धारका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की,घरातील फर्निचर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात इसमाने सोलापुरातील सुशांत वीरेंद्र गांधी (वय-२८, रा. पार्श्वनाथ अपार्टमेंट, बुधवार पेठ ) या तरुणाला १ लाख ९२ हजार पाचशे रुपयांना फसविले आहे.
सुशांत गांधी यांनी आपल्या राहत्या घरातील फर्निचर विकायचे आहे.अशी जाहिरात ओएलएक्स वर टाकली होती. ती जाहिरात पाहून एका मोबाईल धारकाने त्यांना फोन करून ते साहित्य खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्याने गांधी यांना एक क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. गांधी यांनी ते स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून १ लाख ९२ हजार पाचशे कमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावाडी पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास पो.हे.कॉ पोळ हे करीत आहेत.
* गर्दी जमवल्या प्रकरणी दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर : गर्दी जमवल्या प्रकरणी भाजपच्या दहा कार्यकर्त्यांवर अंबिका चौकाजवळील शिवगंगा कॉम्प्लेक्स येथे सार्वजनिक रोडवर स्टेज मारून गर्दी जमून रोडवर खुर्च्या टाकणाऱ्या दहा भाजपा कार्यकर्त्यांवर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील शिवगंगा कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली.याप्रकरणी पोलीस हवालदार संजीव कुमार भगवान भालेराव यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अनंत जाधव, सुरेश धोंडीराम वाडकर, माऊली मोहन काळे,दशरथ भोसले, अविनाश सुरवसे, ज्ञानेश्वर शिरसट व इतर चार कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास पोसई धायगुडे हे करीत आहेत.