मुंबई : मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविषयी धक्कादायक दावा कोर्टात केल्याचे वृत्त समोर येत आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चेंट यांनी चरस सेवन केल्याचे कबूल केले, असा खुलासा एनसीबीच्या पंचनामामध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा क्रूझवर छापा पडला, त्यावेळी आपण जोड्यांमध्ये चरस लपवून ठेवले होते, असे अरबाजने एनसीबीला सांगितले.
आर्यनला अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान, हृतिक रोशन, फराह खान, पूजा भट यांच्यासह अनेक कलाकारांनी जाहीरपणे आर्यनला पाठिंबा दिला आहे. यामध्ये आता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा देखील यादीमध्ये समावेश झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आर्यन खानने ड्रग्स घेतलं होतं की नाही? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट हा 6 ग्राम चरस आपल्या बुटात लपवून क्रुझवर घेऊन जात होता.
मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक झीप लॉक पाऊच काढलं, त्यात चरस होतं.
अरबाज मर्चंटने हे मान्य केलं आहे की तो आर्यन खानसोबत चरस घेत होता. ते क्रुझवर मजामस्ती करण्यासाठीच जात होते. जेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारलं तेव्हा त्याने हे स्वीकार केलं तो चरस घेतो. तसंच हे चरस क्रुझवर स्मोकिंगसाठी नेण्यात येत होतं. कॉरडेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणातील छापेमारीवेळी एनसीबीने केलेल्या पंचनाम्यात हे नमूद करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अशातच, सोमी अलीने आर्यन खान आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देणारी एक मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोमी अलीने एक खळबळ खुलासाही केला आहे. सोमीने सांगितले की, ‘जेव्हा मी १५ वर्षांची होती तेव्हा ड्रग्ज घेतले होते. इतकेच नाही तर ‘आंदोलन’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मी आणि दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीने देखील ड्रग्ज घेतले होते.
दरम्यान, सोमी अलीची ही खळबळजनक पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. सोमी अलीही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड होती. भले सोमी सध्या सिनेमांमध्ये कार्यरत नसली तरी सोशल मीडियावर विविध विषयांवर पोस्ट सातत्याने शेअर करत असते.
सोमी अलीने आर्यनचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सोमीने पुढे लिहिले आहे की, ‘आजच्या काळात असा कुणी मुलगा आहे का ज्याने ड्रग्ज ट्राय केलेले नाही? असे होणे सध्याच्या काळात शक्यच नाही. त्यामुळे या सर्व मुलांना सोडून द्यायला हवे. ड्रग्जची सवय ही वेश्यागमन करण्यासारखेच आहे. ही सवय कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटतेच असे नाही. या गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार करण्याची गरज आहे. त्यात मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. येथे कुणीही संतमहंत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. मी देखील १५ वर्षांची असताना गांजाचे व्यसन केले होते. त्यानंतर आंदोलन सिनेमाच्या सेटवर दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबतही मी ड्रग्ज घेतले होते. अर्थात याबद्दल मला पश्चाताप नाही,’ असेही सोमीने नमूद केले आहे.याच नोटमध्ये सोमीने न्याय व्यवस्थेवरही भाष्य केले आहे. न्यायव्यवस्था आपण कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी आर्यनचा वापर केला जात आहे. यामध्ये या मुलांना त्रास होत आहे.’
दरम्या, काल शुक्रवारी किल्ला कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळ्यानंतर आता आर्यनच्या वकिलांकडून सेशन्स कोर्टात जामीनासाठी अर्ज केला जावू आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशाची कॉपी मिळाल्यानंतरच आर्यन खानचे वकील सेशन्स कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवस लागण्याची शक्यता वकिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे.