मोहोळ : अज्ञात कारणाने वृद्ध दाम्पत्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात उघडकीस आली. पोपट बाबूराव मुळे (वय ६५ वर्षे), कमल पोपट मुळे (वय ५६ वर्षे , दोघे रा. खंडाळी ता. मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या पति पत्नीचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोपट बाबूराव मुळे, कमल पोपट मुळे हे पती पत्नी गुरुवारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात कारणाने घरातून निघून गेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा अमर मुळे व चुलत भाऊ बाळू मुळे यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेच मिळूून आले नाहीत.
दरम्यान शुक्रवारी सकाळी हे दोघे पती-पत्नी शेतातील टोमॅटोच्या पिका शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांना जवळ जाऊन पाहिले असता, त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते दोघे मृत झाले होते. घटनास्थळी कसल्यातरी कीटकनाशकाचा उग्र वास येत असल्याने त्या दोघांनी अज्ञात कारणाने घरातून निघून जाऊन आत्महत्या केल्याची नातेवाईकांची खात्री पटली.
या प्रकरणी बाळू केरू मुळे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत आदलिंगे हे करीत आहेत. मात्र या वृद्ध दाम्पत्याने नेमक्या कोणत्या कारणाने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खंडाळी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सुभाष नगरमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी लाखाचा ऐवज पळविला
बार्शी : शहरातील सुभाषनगर भागात असलेले सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज पळवला आहे. याबाबत घरमालक बापुराव बाबुराव भंडारे (रा. वाणी प्लॉट, कंन्सरचौक, आगळगाव रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बापुराव भंडारे यांचा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. तो अचानक आजारी पडल्याचे समजल्याने घराला कुलूप लावून सहकुटुंब ते पुण्याला गेले होते. तिथे मुलावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असल्यामुळे कुटुंबाला तिथे ठेवून पैशाची तजवीज करण्यासाठी ते सायंकाळी बार्शीस परतले असता त्यांना घराचे मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व कुलूप फेकून दिल्याचे दिसले.
दरवाजा उघडाच होता. त्यामुळे घरात जावुन पाहिले असता बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे होते. व त्यातील साहित्य फरशीवर खाली अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाले होते. त्यामुळे घरात कोणी नसताना घर फोडून सुमारे १ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेल्याची त्यांची खात्री झाल्याने पोलिसाकडे धाव घेतली.