सोलापूर : आपल्या प्रभागातील रस्त्याच्या कामासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर भररस्त्यात ठिय्या मारुन आंदोलन करण्याची वेळ आली. अनेक वेळा अपघात, निवेदने, मागणी करुनही प्रशासानाकडून दुर्लक्ष होत असल्याने सुरेश पाटील यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले.
महानगरपालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभार वेस परिसरातील क्षत्रिय गल्ली येथील विठ्ठल मंदिर समोरील रस्ता गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाईप लाईन साठी या रस्त्याचे खोदकाम करून रस्ता बनवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गेली एक-दीड वर्ष उलटून गेले तरी देखील या रस्त्याचे काम अद्याप देखील झाले नाही. या परिसरातून नागरिकांना ये-जा करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात देखील झाले आहेत.
महात्मा बसवेश्वर सर्कल ते शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभार वेस परिसरात शहर जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी खरेदी करण्यासाठी येत असतात त्यांनादेखील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिले. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. येथील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान शुक्रवारी सत्ताधारी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी याठिकाणी रस्त्यावरच ठाणं मांडून हे रस्त्याचे काम त्वरित संपवा यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत हा रस्ता व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही, अशी भूमिका सुरेश पाटील यांनी घेतले. यामुळे या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम हे या ठिकाणी येऊन आंदोलन मागे घेण्यास सुरेश पाटील यांना प्रवृत्त केले असता सुरेश पाटील यांनी जोपर्यंत या रस्त्याचे काम हाती घेत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी आंदोलनस्थळी येऊन नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी या रस्त्यासंदर्भात चर्चा करून हे काम लवकरात लवकर म्हणजेच उद्याच हाती घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले
नगर अभियंता संदीप कारंजे यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी चर्चा केली. या ठिय्या आंदोलनात सुरेश बिद्री, गणपत मिरजकर, अक्षय बिद्री, महादेव काटवे, तुळशीदास पवार, कुमार मिरजकर, माणिक शालगर, दशरथ शालगर, शशिकांत पुणेकर, शुभम कलशेट्टी आदींसह या भागातील व्यापारी सहभागी झाले होते.