सोलापूर / पंढरपूर : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा आहे. त्याचबरोबर वारी नियमित व्हावी, अशीही इच्छा आहे. मात्र, शासन निर्णयाच्या अधिन राहून वारी भरवावी. याकरीता जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. कार्तिकी यात्रा भरवण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज असून यासंदर्भात आज रविवारी बैठक झाली.
कार्तिकी वारीतील एकादशीचा मुख्य सोहळा सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरीता खूले झालेले आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रा भरवावी की नाही? याबाबत आज रविवारी मंदिर समितीची सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कार्तिकी यात्रा भरवण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज असल्याची माहिती दिली. याबाबत जिल्हाधिका-यांना बैठकीनंतर मंदिर समितीकडून प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे औसेकर यांनी माध्यमांना सांगितले.
औसेकर महाराज पुढे म्हणाले की, कार्तिकी यात्रेला येणार्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे म्हणून दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे. त्याचबरोबर पलंग काढल्यापासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत ऑनलाईन दर्शन बंदच असणार असल्याचे औसेकर यांनी सांगीतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची उपस्थिती होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वाखरी पालखी तळ अशा विविध ठिकाणी भेटी देवून पाहणी केली होती. पाहणी नंतर कार्तिकी यात्रेबाबत मंदिर समितीने प्रस्ताव सादर केल्यास शासनाला प्रस्ताव पाठवून निर्णय शासन निर्देशानुसारच घेण्यात येईल, असे सांगीतले होते. त्यानुसार आज रविवारी मंदिर समितीने कार्तिकी यात्रा भरवण्यास सकारात्मक असल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रस्ताव पाठवला आहे.
* भाविकांची काळजी घेण्यास मंदिर समिती तयार
17 एप्रिल 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद झाल्या आहेत. मात्र सध्या कोरोनाचे सावट कमी झाले आहे. शासन निर्णयानुसार येणार्या प्रत्येक भाविकाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापरणे करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, भाविकांची काळजी घेण्यास मंदिर समिती तयार आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून मंदीर समिती यात्रेसाठी सज्ज असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.
* 27 किलो सोन्याच्या वस्तू, दागिने वितळवून बनवणार नवीन अलंकार
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान- लहान वस्तू, कमी वजनाचे दागिने अर्पण केले आहेत. समितीने हे सर्व छोटे दागिने आणि वस्तू पोत्यात भरून ठेवले आहेत. त्यामुळे मंदिर समितीने शासनाच्या विधी व न्याय विभागाला सुमारे 27 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू, दागिने वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे.
मंदिर समितीचे नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी या संदर्भात नवीन पत्र तयार केले आहे. शासनाच्या न्याय व विधी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सोने- चांदी वितळवण्यासाठी परवानगी देण्याविषयी पत्रात नमूद करण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यावर फक्त त्याच्या विटा करण्याऐवजी श्री विठ्ठल- रुक्मिणीस नवीन अलंकार करावेत आणि त्या सोन्या-चांदीचा उपयोग व्हावा असे नियोजन असल्याचे गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले.