श्रीपूर : भाजपाची कांही नेतेमंडळी देगलूर येथील पोटनिवडणुकीत जाऊन तुम्ही भाजपाला निवडून द्या, ईडीचे लक्ष आहे असे म्हणत होती. परंतु देगलूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला व लोकांनी भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. भाजपाच्या खिशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग असेल पण त्यांच्या खिशात लोकशाही नाही, असा घाणाघात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात केला.
रोहित पवार हे श्रीपूर-महाळूंग येथे युवक मेळाव्या प्रसंगी बोलत होते.प्रारंभी मौला पठाण यांच्या एस पी स्मार्टचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, दि.सासवड माळी शुगरचे एम.डी रंजनभाऊ गिरमे, सुभाष गुळवे आदींची उपस्थिती होती.
आमदार रोहित पवार म्हणाले की, मागील कांही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या नेत्यांचा कुठल्या ना कुठल्या एजन्सिजचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे कांही नेते म्हणतात की, राष्ट्रवादी व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते आमच्या खिशात आहेत. परंतु त्यांच्या खिशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग असेल पण त्यांच्या खिशात लोकशाही नाही हे खरे आहे.
श्रीपूर – महाळूंग नगरपंचायतीत आपल्याला विकास करावयाचा असून आपल्याला विकास करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. येणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला मतदार व कार्यकर्ता म्हणून आपल्या उमेदवाराला ताकद द्यावयाची आहे. युवकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, कांही लोक आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील पण कुणीही किती दाबले तरी आपण ताकदीने पुढे झाले पाहिजे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुठेही कमी पडू नका १७ पैकी १७ जागा आपल्या विचारांच्या निवडून आणावयाच्या आहेत, असेही आ.पवार म्हणाले.
या भागातील लोक म्हणतात की, पोलिसांचा वापर केला जातोय पण कांही काळजी करू नका वळसे-पाटील साहेबांशी बोलून आपली ही गावे दुसऱ्या पोलीस स्टेशनशी जोडू, त्यामुळे तुमची छोटी-मोठी कामे होतील. तुमच्या अडचणी कमी होतील. तसेच आमदार बबनदादांचे १४ गांवासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
महाळूंग येथील अंबाबाईचे मंदिर केंद्र शासनाच्या अंतर्गत आहे. केंद्र सरकार मुद्दाम करत असेल असे मी म्हणत नाही. परंतु त्या ठिकाणची नुसती वीट काढली किंवा लावली तर कारवाई होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. असे असले तरी आमदार बबनदादांनी पाठपुरावा केला असून पवार साहेबांची त्या विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. आपल्या यमाईचे मंदिर अनेक वर्षापासून ताकदीने टिकले आहे ते आणखी सुंदर व्हावे, असेही यावेळी आ. रोहित पवार यांनी सांगीतले.
यावेळी रणजीतसिंह शिंदे, उत्तमराव जानकर यांनीही विचार व्यक्त केले. सुरेश पालवे, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग माने देशमुख, जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, किरण साठे, आबासाहेब वाघमारे, गणेशबापु पाटील, रावसाहेब सावंत पाटील, राहुल रेडे-पाटील, विक्रांत रेडे पाटील, विक्रमसिंह लाटे, लखन धुमाळ, मौला पठाण, बंडू वाळेकर, दादा लाटे, बापू रेडे, राहुल खटके, शिवसेनेचे नितीन वाघमारे आदि मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.