सोलापूर : मागील वीस महिन्यांपासून देवाच्या दर्शनासाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या वृध्दांना राज्य शासनाने सुखद धक्का दिला असून सर्व धार्मिक स्थळे 65 वर्षांच्या पुढील भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कार्तिकी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून ‘विठुराया पावला’ या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना काळात सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. तर अनलॉक प्रक्रियेमध्ये धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, 65 वर्षांपुढील वृध्द, गरोदर महिला व 10 वर्षांपेक्षा लहान मुलांना दर्शनास परवानगी नाकारली होती. याचा सर्वाधिक फटका पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांना बसत असे. पंढरीतील बहुतांश भाविक हे 65 वर्षांच्या पुढील असल्याने दर्शन होत नसल्याने त्यांच्याकडून सतत नाराजीचा सूर येत होता.
सध्या कार्तिकी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले असून या भाविकांना आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेता येत नसल्याने डोळ्यात पाणी येत होते. मागील चार दिवसांपासून अनेक वृध्द वारकरी, महिला भाविक यांना दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर आधार कार्ड पाहून सोडले जात होते. 65 वर्षांपेक्षा अधिक वय असेल तर त्यांना रोखले जात असल्याने भाविक तेथेच डोळ्यात पाणी आणून गयावया करत असत.
अखेर गुरुवारी दुपारी अचानक शासनाने सदर अट रद्द केली. याबाबतचा लेखी आदेश प्राप्त होताच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तत्काळ याची अंमलबजावणी देखील सुरू केली. यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक भाविकांनी तर डोळ्यात पाणी आणून पांडुरंगाने आमची प्रार्थना पूर्ण केली म्हणून मंदिरासमोर लोटांगण घातले.
65 वर्षापवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांचे व गरोदर स्त्रियांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच लसीकरणाच्या दुसर्या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा 65 वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांचे व गरोदर स्त्रियांना धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा देण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे, हात धुणे, थर्मलस्क्रिनींग अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिर समिती देखील सॅनिटायझर, मास्कची सोय करणार असल्याचे गजानन गुरव (प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी मंदिर समिती) यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर तब्बल 20 महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरत आहे. कोरोना नियम व अटीनुसार यात्रा भरवण्यात येत आहे. याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे. तर लहानांपासून अबालवृध्दांपर्यंत सर्वजन श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आसुसलेले आहेत. त्यामूळे कार्तिकी यात्रा सोहळ्याला राज्यभरातून व परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचे नियम पाळत 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसापुर्वी देखील मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना याबाबत विचारले असता, मंदिर समितीकडे नियमावली अलेली नसल्याने दि. 29 सप्टेंबर रोजी च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याच मंदिरात प्रवेश नाही. त्यामूळे याही कार्तिकी यात्रेत हाच नियम ठेवून 10 वर्षाखालील लहान मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरीता सोडले जाणार नसल्याचे गुरव यांनी सांगीतले होते.
दर्शनाकरीता लांबून येणारे सहकुटूंब भाविक, त्यांच्याबरोबर आलेले वृध्द मातापिता तसेच लहान मूले व गरोदर महिला यांना मंदिर प्रवेश मिळत नव्हता. त्यामूळे यांना विठ्ठलाच्या दारात येवून देखील दर्शन मिळत नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेवून राज्य शासनाने दि. 10 नोव्हेंबर रोजी नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी खूले करण्यात आलेली आहेत.
* कार्तिक वारीसाठी खासगी वाहनांची सोय
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. त्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहनांची व्यवस्था एसटीच्या तिकीट दरात करण्यात आली आहे. प्रवाश्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाश्यांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, प्रवाश्यांनी 0217- 2303099 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची कार्तिकी यात्रेच्या तोंडावर गैरसोय होत आहे. कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभाग पुर्ण क्षमतेन काम करीत असून परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने विशेष वाहनांची व्यवस्था पंढरपूर बस स्थानक येथून करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर सांगोला, मिरज, कुर्डूवाडी, पुणे, बार्शी, औरंगाबाद अशा ठिकाणी वाहने प्रवाशांना घेऊन जात आहेत. प्रामुख्याने कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेगाड्यांची संख्या भरपूर असल्याने कुर्डूवाडी , सांगोला, मिरज अशा रेल्वे स्थानकापर्यंत खाजगी वाहतूक परिवहन विभागाच्या वतीने केली जात आहे.