सोलापूर / पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही पूजा केली. तर कोंडीबा देवराव टोणगे व त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे या दाम्पत्यास महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी मंदिरात हजेरी लावली होती.
राज्यात सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुरायाला निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला तर श्री रुक्मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्मिणीतेचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
आज पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार समाधान आवताडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांत अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच सदस्य उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) या टोणगे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा करता आली आहे. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी विठ्ठलाच्या दर्शन रांगेतून निवडला जातो. व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मागील कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात आली होती. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून मागील कार्तिकी एकादशीला निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.
* सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल
आषाढी कार्तिकी विसरु नका मज’ अशी भक्तांकडे विनवणी करणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या भक्तांना तब्बल दोन वर्षानी तो योग आला आहे. पंढरीत सोमवारी होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या आनंदमयी, अनुपम सोहळ्यासाठी भाविकांचे डोळे आसुसलेले असून सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे. सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे. त्यामध्ये वारकरी मनसोक्त स्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत.
कार्तिकी सोहळ्याच्यानिमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर गेल्या दोन वर्षांत प्रथमच टाळमृदंगासह विठुनामाचा जयघोष ऐकू येत आहे. पंढरपुरातील विविध मार्गावर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळमृदंगाचा गजर करणारे दिंडीकरी असे चैतन्यमय दृष्य पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या कमी असली तरी खासगी वाहने, ट्रॅव्हल्सच्या बसेसनी रविवारी सायंकाळपर्यंत बऱ्यापैकी भाविकांची दाटी पंढरपुरात झाली आहे. मठामठामध्ये चैतन्य फुलले असून कार्तिकीची लगबग सर्वत्र दिसत आहे.
“रशिया व युरोप मध्ये कोरोनाने तोंड वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनेच नागरिकांनी कोरोना बाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने दुसरा डोस देखील घ्यावा”
– अजित पवार , उपमुख्यमंत्री