पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाने याविषयी माहिती दिली आहे. पुण्यात आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव 8.30 वाजता त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे झाला. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्ताऐवज, गडकिल्ले, मराठा सम्राज्याचा अभ्यास केला. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या १०० वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच ‘फुलवंती’ आणि ‘जाणता राजा’ ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले.
तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत ‘माणूस’ साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग, असा त्याचा कार्यकाळ आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्यांचा सरकारवाडा, पुरंदर्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड असे लेखन केले आहे.
काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काल रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे निधन झाले.
* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय
– बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला.
– इतिहासाविषयी अभिमान, संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा- वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.
– प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषणक्षमता, प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात.