सोलापूर – जागेच्या वादातून कर्नाटकातील एका रिक्षाचालकाचे नाट्यमयरित्या अपहरण करून त्याला तीक्ष्ण शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना कळबगाव (ता. अक्कलकोट) येथे गुरुवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली.
महेबूब सैपनसाब कलबुर्गी (वय ३२ रा.तडवळगा ता. इंडी जि. विजयपूर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला मुन्ना चांदसाब पटेल (रा. तडवळगा) आणि अन्य दोघांनी मारहाण केली अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीसात झाली आहे.
महेबूब कलबुर्गी याला त्याच्याच गावातील मुन्ना पटेल याने इंडि येथे नातेवाईकाचे काम आहे, माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला दुचाकीवरून बुधवारी सायंकाळच्या सुमारास नेले होते. वाटेत जेवण केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पटेल याच्यासोबत आणखीन दोघा इसमांनी दोन दुचाकीवरून त्याला कळबगाव (ता. अक्कलकोट) येथील निर्जन वस्तीत नेले.
त्या ठिकाणी त्याला चाकू आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. आणि त्याचे गुप्तांग कापून पसार झाले. रात्रभर महेबुब रक्ताच्या थारोळ्यात तेथेच निपचित पडून होता. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका तरुणाने त्याला पाहिले. चौकशी करीत त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून हा प्रकार कळविला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकाने घटनास्थळी येऊन जखमीला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार केले.
पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध