बार्शी : माहेरहून सासरी परतत असलेल्या विवाहितेचा रस्त्यातच कुरबूर सुरु झाल्यानंतर दुचाकी थांबवून नवर्याने कोयत्याचे सपासप वार करुन खून केला. वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीनेच बापाने कोयत्याने वार केल्याचे सांगितले.
अवघ्या 6 वर्षाच्या मुलीला आणि 3 वर्षाच्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीसोबत सोडून तो दुचाकीवरुन फरार झाला. खूनाचे कारण अद्याप उलगडलेले नसून काही तासापूर्वीच हसतखेळत घर सोडलेल्या सोनालीचा मृतदेह पहावा लागल्यामुळे तिच्या आई-भावांना जबर धक्का बसला आहे. भाऊ अतुल दिलीप हेडंबे (रा. धामणगांव (दु.) ता. बार्शी) यानी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो.नि. विनय बहीर करत आहेत.
धामणगाव येथील रहिवाशी असलेल्या सोनालीचा सन 2012 मध्ये तालुक्यातीलच भातंबरे येथील किरण तुकाराम घरबुडवे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दिक्षा व सिध्दार्थ अशी दोन अपत्ये झाली आहेत. त्यांचा संसार सुखा समाधानाने सुरु होता. ते गेल्या शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुचाकीवरुन धामणगांव येथे आले होते. सोमवारी, 22 रोजी रात्री 11 वाजता अचानक गावाकडे भातंबरे येथे काही काम निघाल्यामुळे किरण आणि सोनाली दोघे दुचाकीवरुन भातंबरे येथे गेले आणि मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास परतले.
त्यानंतर अंघोळ, चहापान करुन सर्वजण पुन्हा दुचाकीवरुन सकाळी 9 वाजता भातंबरे येथे निघाले. तोपर्यंत दोघांमध्ये काही बेबनाव आहे, याचा अंदाज सोनालीच्या माहेरीही आला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना हसतखेळत निरोप दिला. त्यानंतर 12 वाजता सोनाली मुंगशी (आर.) ते उपळे दु. रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडली आहे, असा निरोप धामणगावला आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लागलीच तिच्या दोन्ही भावांनी अमोल आणि अतुल यांनी धाव घेतली. अमोल हा घटनास्थळाकडे गेला तर अतुल बार्शी येथे उपचाराच्या पुर्वतयारीसाठी गेला. अमोलला सोनाली रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्दावस्थेत पडलेली आढळली. तिच्या अंगावर कोयत्याचे वार होते. काही वेळातच अमोल सोनाली हिला घेवून बार्शी येथे आला.
मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. लहानग्या दिक्षाने चालत्या गाडीवरच पप्पा आणि मम्मीची भांडणे सुरु असल्याचे पाहिले होते. तिनेच पप्पाने गाडी थांबवून गवतातून कोयता आणून मम्मीला मारल्याचे सांगितले. घटनेपूर्वी सोनाली हिने माहेरी धामणगाव येथे असताना पतीबद्दल काही तक्रार केली नव्हती. त्यामुळे दुचाकीवर असे कशावरुन भांडण झाले की त्याची परिणिती सोनाली हिच्या खूनात झाली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
* पैशासाठीच खून केल्याचा संशय
आरोपी किरण घरबुडवे यास दारुचे व्यसन होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्याने सोनालीकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. मात्र सोनालीने माहेरी ही बाब सांगितली नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने सासरवरुन परतावे लागत असल्यामुळे त्याने सोनालीचा खून केला असावा, असा संशय आहे.
* पूर्वनियोजित खून
किरणने घटनास्थळी कोयता अगोदरच लपवून ठेवला होता. जाताना त्याने खूणेच्या ठिकाणी दुचाकी थांबवून केायता आणून सोनालीवर वार केले. सोनाली बेसावध होती. तिला किरणच्या हेतूची कसलीच कल्पना आली नाही. किरणने वैराग येथेच कोयता खरेदी करुन तो आदल्या रात्री भातंबरे येथे जाण्याचा बहाणा करुन रस्त्यात लपविला असावा, असा संशय आहे.