सोलापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील २५ वर्षापासून ते बँकेचे संचालक आहेत. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पुन्हा एकदा बँकेवर जाण्याचा भरणे यांचा मार्ग सोपा असल्याचे मानले जात आहे. आता भरणे यांच्याविरोधात उमेदवार कोण असणार, ते विजयाची परंपरा कायम राखणार का, हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. २ जानेवारी २०१२ रोजी मतदान होणार असून २९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ही बँक म्हणजे पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.
राज्यमंत्री भरणे मागील २५ वर्षापासून संचालक असून त्यांनी अध्यक्षपदाची पुराही सांभाळली आहे. भरणे हे मागील अनेक वर्षापासून ब वर्गातून निवडणूक लढवत आहेत भरणे यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्ज भरताना दत्तात्रय भरणे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आ. संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रवीण तुपे, जयदीप काळभोर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रूपनवर, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
सध्याची इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले आहेत. विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनीही पाटलांना साथ दिली आहे. त्यामुळे भरणे यांच्याविरोधात भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भरणे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळणं मिळाले आहे.
आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भरणे आणि पाटील या दोघांमधील राजकारण रंगणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
* ९० जण करणार मतदान
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखल केलेल्या ‘ब’ वर्गासाठी पणन व कृषी सहकारी संस्थाचे प्रतिनिधी मतदान करतात. जिल्हामध्ये सुमारे ९० मतदार आहेत. जिल्हा बँकेवर सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतेक पणन कृषी सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भरणेमामा यांचा विजय निश्चित मानला जात आहे.