बार्शी : सोलापूरमध्ये बार्शी-आगळगाव रस्त्यावर वाणी प्लॉट परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेवक विनोद संजय वाणी यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. बंगल्याच्या गेटवर चढून आवारात दगड आणि बियर बाटल्या फेकल्या. गावठी पिस्तुलातून हवेत दोन वेळा फायरिंग केली. पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बार्शीतील माजी नगरसेवक विनोद वाणी यांच्या सुभाषनगर भागातील घरावर चौघाजणांनी बियरच्या बाटल्या फेकत शिवीगाळ, दगडफेक, गोळीबार करुन हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी रात्री घडला. सदरील हल्ला राजकीय कारणावरुन घडला असल्याचा आरोप वाणी यांनी केला आहे.
नगरपालिका निवडणूकीपूर्वी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे पोलिस दलाकडून याची गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत विशाल संजय वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोन्या हाजगुडे , विपुल यादव , नागेश चव्हाण तिघेही (रा. वाणी प्लॉट, बार्शी), सोमा कदम ( रा. कथले प्लॉट, बार्शी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आज शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास या घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान न उडालेले तेथे पडलेलं एक जिवंत काडतूस आणि हवेत फायरिंग केल्यानंतर आवारात पडलेली पुंगळी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी हे दोन दुचाकीवरून आले होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेचा तपास करीत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुभाषनगर भागातील वाणी प्लॉटमध्ये विनोद वाणी यांचा बंगला आहे. रात्रौ 2.30 ते 3 च्या सुमारास घरातील मुख्य हॉलमध्ये त्यांचे बंधू विशाल हे टी.व्ही. पहात बसले होते. यावेळी आरोपी गेटसमोर आले. त्यांनी मोठमोठ्याने वाणी बाहेर ये असा आरडाओरडा करत गेटवरुन बियरच्या बाटल्या फेकत शिवीगाळ करून दगडफेक केली. त्यानंतर गेट वर चढून त्यांनी दरवाजाच्या दिशेने पिस्तुल सारख्या शस्त्राने गोळीबार केला.
त्यांनी एक दार उघडून बघितले असता गेटवर चढलेले आरोपी दिसले. ते घरात शिरतील म्हणून त्यांनी तत्काळ दार बंद करून फोनवरुन पोलिसांशी संपर्क केला. पंधरा मिनिटांत सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्नेवाढ आणि त्यांचे पथक दाखल होताच आरोपींनी तेथून पळ काढला.
यावेळी वाणी बंधूंनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पंधरा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिस येण्याची कुणकुण लागताच हल्लेखोर फरार झाले. घटनास्थळी एक जिवंत काडतूस आणि एक पुंगळी सापडली आहे. मागील झालेल्या भांडणास फिर्यादी जबाबदार आहे. अशा समजुतीतून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
काल शुक्रवारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याबाबत बार्शी शहर पोलिसांत विशाल वाणी यांनी तक्रार दिली आणि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत पुढील तपास स.पो.नि. स्वप्नील इज्जपवार करीत आहेत.
* हल्ल्याची पार्श्वभूमी
29 नोव्हेंबर 21 रोजी फिर्यादीचा मित्र विकी जाधव आणि आरोपीव्दय विपुल यादव व नागेश चव्हाण यांची दुपारी 2 वा. हॉटेल अश्वराज येथे तसेच दु. 4 वा. रिंगरोड येथील किरण स्वामी यांचे गॅरेजवर भांडण झाले होते. यातील सर्व संबंधित परिचित असल्याने फिर्यादीने त्यांचे भांडण सोडविले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी 30 नोव्हेंबर 21 रोजी रात्री 11 वा. त्यांची नगरसेवक बापू वाणी यांच्या घराच्या जवळ पुन्हा भांडण झाले. ते भांडण सुध्दा फिर्यादीने मिटविले.
त्यानंतर 2 डिसेंबर 21 रोजी संध्याकाळी 7 वा. विपुल यादव, सोन्या हाजगुडे व इतर दोन ते तीन जणांनी किरण स्वामीचे घरी पंकजनगर येथे जावून तोडफोड केली व किरण स्वामी व त्याचा भाऊ स्वप्निल स्वामी यांना मारणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने किरण स्वामी यास पोलिसांकडे जावून फिर्याद देण्यास सांगितले होते. मात्र भितीमुळे स्वामी पोलिसांकडे गेला नाही. त्यानंतर मध्यस्थी करणार्या विशाल वाणी यांच्या घरावरच दहशत बसविण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला.