बार्शी : बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी 6, उपाध्यक्षपदासाठी 4 व सचिवपदासाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात असून येत्या 13 डिसेंबर रोजी त्यासाठी मतदान होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. विकास जाधव यांनी दिली.
इतर पदाधिकार्यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्ष निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीलाच मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सूचनेनुसार निवडणुका घेण्यात येत आहेत. बार्शी वकील संघाच्या कार्यकारिणीची निवड नेहमीच चुरशीने होते. यावेळी तर दोन वर्षाची प्रतिक्षा करावी लागल्यामुळे इच्छूकांची संख्या वाढली आहे.
अध्यक्षपदासाठी गणेश मधुकर काळे , पद्माकर बिभीषण काटमोरे, रत्नमाला के. पाटील, शिवाजी आर. जाधवर , अविनाश हौसेराव जाधव, काकासाहेब दत्तू गुंड रिंगणात आहेत. उपाध्यक्षपदासाठी अजय शिवाजी भुसारे, उषा नंदकुमार पवार, विशाल दिलीप गोणेकर , भगवंत शिवाजीराव पाटील तर सचिवपदासाठी इकबाल दस्तगीर पठाण , नरेंद्र मधुकर घोडके हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये खजिनदार अनंत अप्पाराव मस्के, लायब्ररी चेअरमन अविनाश कोंडिबा गायकवाड, व्यवस्थापन समिती सदस्य उषा नंदकुमार पवार , संजय श्रीराम गुंड , धिरज हरी कांबळे, अक्षय नागनाथ बिडबाग यांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* बार्शी बस स्थानकातून पुण्याला पोलिस बंदोबस्तात पहिली बस रवाना
बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात बार्शीहून पुण्याला पहिली बस रवाना करण्यात आली.
कर्मचार्यांचा संप अद्याप कायम असला तरी आणि कर्मचारी कामावर परतायला तयार नसले तरी संपामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल पाहून एसटीच्या स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत बससेवा सुरु केली आहे. अखेर बससेवा सुरु झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगारातील एकूण सहाशे कर्मचार्यांपैकी 32 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळी बार्शी ते पुणे शिवशाही बस क्र. एमएच 14 जीव्ही 3106 ही चालक राजेंद्र अपदार व वाहक प्रसन्न देवकर यांच्या सारथ्याखाली पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आली. स्थानिक पातळीवर बस सेवा सुरु करण्यास काही विरोध झाला नाही परंतू खबरदारी म्हणून पुण्यापर्यंतच्या प्रवासात मार्गातील पोलिस ठाण्याच्या हद्दीनुसार पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
दीर्घकाळ चिघळलेल्या संपामुळे खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. जीप, रिक्षा आदी वाहने दुप्पट, तिप्पट भाडे आकारुन लूट करत आहेत. विशेषत: महिला व वृध्दांची मोठी अडचण होत आहे. बससेवा सुरु करण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे.
बार्शी हे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारे मोठे वाहतूक केंद्र आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड आदी जिल्ह्यात जाणार्या बहुतांश गाड्या बार्शी मार्गेच जातात. संपामुळे या प्रवाशांची कोंडी झाल्याने प्रवाशांची सतत मोठी वर्दळ असणारे व दिवस-रात्र गजबजलेले बार्शी बसस्थानक गेले काही दिवस स्मशानशांतता अनुभवत आहे. रविवारी सुरु झालेली बस सेवा विस्तारत गेल्यास बार्शी बस स्थानकाला पुन्हा प्रवाशांचे दिन येणार आहेत.