बार्शी : शहरात प्राणघातक शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक नागेश दुधाळ यांनी मध्यंतरी केलेल्या गोळीबाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दुधाळ यांनी आपल्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना आहे तसेच आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी यापूर्वीही त्यांनी अशीच कारणे पुढे करत गोळीबार केलेला असल्याने त्यांच्या दाव्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
त्यांचे पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी याबाबत पुढील कारवाई अधांतरी आहे. प्रभाग 18 अ चे नगरसेवक असलेले नागेश दुधाळ उपळाई रस्त्यावरील शेंडगे प्लॉट येथील रहिवाशी आहेत. दि. 15 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी गोळीबार केल्याचे उघडकीस आले होते. त्या रात्री ते नेहमीप्रमाणे जेवणखाण उरकून झोपी गेले असता मुलगा अभिषेक यास रात्रौ 11.30 ते 1 च्या दरम्यान घागर पडल्याचा आवाज आल्याने जाग आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याने खिडकीतून पाहिले असता तोंडाला काळे फासलेले व काळे कपडे घातलेलेे आणि हातामध्ये धारदार शस्त्र असलेले काही चोरटे दिसले. त्यामुळे त्याने कुटुंबातील इतर सदस्यांना जागे करत दुसर्या रुममध्ये झोपलेल्या दुधाळ यांना मोबाईलवरुन माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पिस्तुल घेवून चोरट्यांचा मागोवा घेतला.
चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून चालले होते. मात्र शेजार्यांना ते अंधारात बसलेले दिसले. त्यांनी दगडधोंड्याचा मारा सुरु केल्याने त्यांनी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून ते पळून गेले. यादरम्यान पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसही आले होते. अशी माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र त्यांच्या या हकीकतीतील तपशीलात अनेक विसंगती आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांची माहिती साशंकतापूर्ण असल्याचे आढळून आले आहे.
दुधाळ यांच्याकडे हॉटेल पराग बार, परमिट रुमच्या उपळाई, खांडवी, अलिपूर येथला आर्थिक कारभार आहे. खांडवी येथे पेव्हिंग ब्लॉकचा कारखाना आहे. यापूर्वी त्याठिकाणी झालेल्या घटनेतही त्यांनी गोळीबार केला होता. मात्र त्याबाबत सखोल चौकशी झाली नव्हती. त्यांनी गोळीबार करण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती का नाही, हे पडताळले गेलेले नाही. परवानाधारक शस्त्राचा त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याच्या शक्यतेची चाचपणी होत आहे.