मुंबई : छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरूवात केली. त्यांच्या या उपोषणाचा आज (28 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. संभाजीराजे यांची प्रकृती आज खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांची पत्नी आणि पुत्र आझाद मैदानावरती दाखल झाले आहेत. दरम्यान सरकारने आज संभाजीराजे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.
तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, 60 तास झालेत त्यांना आमरण उपोषण करत आहेत. त्यांचं शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.
रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोबतच संभाजीराजेंना कालपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजेंकडून नकार देण्यात आला आहे. डाॅक्टरांकडून कालच सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार दिला आहे. Sambhaji Raje’s health deteriorated; Wife-son filed on Azad Maidan, invitation from government for discussion
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असल्याचं त्यांनी सकाळी सांगितलं होतं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.
या आंदोलनात सुरुवातीपासून संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे त्यांच्या सोबत आहेत. त्या भावूक झाल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आज देखील संयोजिताराजे त्यांच्या सोबत होत्या. यावेळी त्यांनी समन्वयकांना सौम्य शब्दात खडसावलं. संयोजिताराजे शिष्टमंडळाला विनंती करत म्हणाल्या की, तोडगा काढूनच या. तसंच राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका, अशीही विनंती त्यांनी केली. हायपोप्लासियात गेल्यावर त्यांना मानसिक त्रास देणं चांगलं नाही, असं त्या म्हणाल्या.
□ निदान सहा मागण्या
खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी जवळून पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले. याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले.
तब्बल 12 मिनिटे 28 सेकंद त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ दुसर्या हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली.
□ संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा, उद्या नांदेड बंदची हाक
मराठा आरक्षणासाठी मुंबईत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातील संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच नांदेडमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध म्हणून हैदराबाद हायवेवर टायर जाळले आहेत. तसेच नांदेडमध्ये उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या (1 मार्च) नांदेड बंदची हाक दिली आहे.