सातारा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावर छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. त्यामुळे विधान करून महाराष्ट्राच्या भावना दुखावल्यामुळे केलेलं विधान कोश्यारींनी मागं घ्यावं, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल या वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडले आहेत. शिवप्रेमींकडून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील टीका केली आहे.
उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देऊन चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, खर तर आपल्या पदाची मर्यादा ठेवून राज्यपालांनी वक्तव्य करायला हवे होते. शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. Is. Shivaji Maharaj’s Ramdas was never a Guru – Udayan Raje Bhosale; So who said dhoti will pay
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वक्तव्य केले आहे. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला, तो यशस्वी होतो, असेही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना, मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. शक्तीची सर्वत्र पूजा होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्ती सर्वकाही असल्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला, तो यशस्वी होतो. चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असे राज्यपालांनी म्हटले आहे.
□ शिवभक्त धोतर फेडणार
मराठा समाजाचे नेते आणि आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलंय.
राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडणार! pic.twitter.com/0oDxtAiKdi
— Vinod Patil (@vnpatilofficial) February 28, 2022
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.
काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते.
□ राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे असतानाही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार असल्याचे म्हटले.
भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे.