● उद्योगपती अभिजित पाटलांची मागणी शरद पवारांकडून मान्य
पंढरपूर : पंढरपूर तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. पंढरपूरचे उद्योगपती अभिजित पाटील यांनी या कारखान्याची निवडणूक घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेकडे केली होती. ही मागणी शरद पवार यांनी मान्य केली असल्याची माहिती उद्योगपती अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्मवीर औंदुबरअण्णा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील शेतक-यांसाठी या कारखान्याची उभारणी केली होती. अत्यंत अचुक नियोजनामुळे हा कारखाना नफ्यामध्ये होता. कालांतराने या कारखान्यात देखील राजकीय घडामोडी होउन कारखान्यावर कर्जांचा डोंगर उभा राहिला आहे. कै वसंतदादा काळे, कै राजाभाऊ पाटील, माजी आ कै भारत भालके यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा संभाळली आहे.
आर्थिक अडचणीमुळे सन २०१९ चा गाळप हंगाम सुरु झाला नव्हता. कारखाना बंद असल्यामुळे विठ्ठलच्या सभासदांच्या ऊसाचे नुकसान झाले व कारखान्याच्या उभारणीपासून प्रथमच कारखाना बंद राहिल्याचा ठपका तत्कालीन चेअरमन दिवंगत आमदार भारत भालके यांच्यावर पडला. Election process of Shri Vitthal Sahakari Sugar Factory started
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र भाजप सरकार सुडबुध्दीने कारभार करीत असून त्यांनीच कारखान्याला बँकेकडून कर्जे उपलब्ध करुन दिला नसल्याचा खुलासा भारत भालके यांनी केला होता. यानंतर अथक परिश्रमाने भारत भालके यांनी सन २०२० साली कारखाना सुरु केला. मात्र याच काळात भारत भालकेंचे आजारपणात निधन झाले. यानंतर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटली. शेतक-यांचे ऊस बिल, कामगारांची थकित देणी दिली नाहीत.
आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर संचालक मंडळातील वाद चव्हाट्यावर आला. यावर्षी कारखान्याचा गाळप हंगाम बंद आहे. सध्या कारखान्याचे चेअरमन म्हणून भारत भालकेंचे पुत्र भगिरथ भालके काम पाहत आहेत. त्यांना अद्यापर्यंत कारखान्याची गाडी पूर्वपदावर आणता आली नाही. सध्या या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
□ भगिरथ भालके – कल्याणराव काळे यांची भूमिका गुलदस्त्यात
विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून दिवंगत आमदार भारत भालके काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिवारातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी याअगोदरच भगिरथ भालकेंच्या विरोधात उघड भूमिका घेत निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
याचबरोबर कारखाना प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कामकाज केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेत दावा दाखल केला आहे. कल्याणराव काळे व भगिरथ भालके हे कारखान्याच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांना अद्यापपर्यंत यश आले नाही. आता निवडणूक प्रक्रियेत या दोघांची भूमिका काय राहणार हे अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे.
□ अभिजित पाटील पूर्ण ताकदीने लढणार निवडणूक
विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढवणेसाठी उद्योगपती अभिजीत पाटील यांनी पूर्ण तयारी केली आहे. सध्या ते नांदेड जिल्ह्यातील धाराशिव कारखान्याचे तीन युनिट व सुमारे बारा वर्षे बंद असलेला सांगोला येथील कारखाना सक्षमपणे चालवत आहेत. भारत भालकेंच्या निधनानंतर अभिजीत पाटील हे शरद पवार, अजित पवार यांच्या सतत संपर्कात असून सांगोला येथील बारा वर्षे बंद असलेला कारखाना सुरु करण्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिजीत पाटील यांना मदत केली आहे.