मुंबई : मराठा आरक्षणासाठी येथील आझाद मैदानात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोडले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही त्यांचे उपोषण सोडले. यावेळी आझाद मैदानावर मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला.
मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानं आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं.
उपोषणस्थळीच सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे चर्चेसाठी आले होते. चर्चेनंतर राज्यसरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानात मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला. Maratha reservation: All demands accepted, Sambhaji Raje’s fast finally called off
Azad Maidan Live https://t.co/SQIqJMeJLH
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 28, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी राज्य सरकारच्यावतीने चर्चेसाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मान्य केलेल्या मागण्या यावेळी नमूद केल्या. यावेळी शिंदे यांनी सभाजीराजेंनी मराठा समाजासाठी मोठा लढा दिला असल्याचं नमूद केलं. शिंदे यांनी या सर्व मागण्यांची तारीखनिहाय पूर्तता होणार असल्याचं सांगितलं. ज्यानंतरच संभाजीराजे यांनी उपोषण स्थळी एका लहान मुलीच्या हातून रस घेऊन उपोषण सोडलं.
□ या मागण्या झाल्या मान्य
– मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. दरम्यान या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
– मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
– सारथीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.
– सारथी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
– सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
– आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
– मराठा समाजातील बांधवांना व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवी पॉलीसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
– आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थासाठी पूर्णवेळ महासंचालक, तसंच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु.
– विविध जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु, तसंच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचं गुढीपाढव्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करु.
– कोपर्डी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार.
– मराठा आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊ, प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येतील.
– मराठा आंदोलनात मृत आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्र पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ.