● 9 मार्च रोजी भाजपतर्फे भव्य मोर्चा
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधीमंडळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गोंधळ झाला. भाजप आमदार आक्रमक झाले. तसेच त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नाकारला. त्यामुळे राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले, असा आरोप भाजपने केला आहे.
महाराष्ट्रात नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सरकार आणि विरोधक आमनेसामने आहेत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजप सातत्याने मागणी करत आहे.
याचदरम्यान आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजप आमदारांनी विधानपरिषदेसमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. भाजप आमदारांनी नवाब मलिक हाय हाय अशा घोषणा दिल्या. विधीमंडळाच्या पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी बॅनर ठेवला, त्यावर भाजपचे सर्व आमदारानी स्वाक्षरी मोहीम राबविली.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत भाजपची आक्रमक भूमिका कायम असेल, असं भाजपने म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबवत आहे.
Confusion over the issue of OBC reservation in the convention, signature campaign against Malik
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवाब मलिक यांच्या अटकेपासून भाजप सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री तुरुंगात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, मात्र त्यांचा राजीनामा मागितला जात नाही.फडणवीस म्हणाले, “सरकारला त्यांचा राजीनामा का स्वीकारावासा वाटत नाही? हे सरकार ‘दाऊद शरण’ आहे. दाऊदशी संबंध असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हे सरकार एकत्र येत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले असून त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्च रोजी भाजपतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला.
मुंबई येथे त्यानिमित्ताने मुंबई भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत मार्गदर्शन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी जी, खा. मनोज कोटक आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते’, असं ट्वीट करत 9 मार्च रोजी मलिक यांच्या मागणीसाठी भाजप भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.