■ ‘माझे मुल माझी जबाबदारी’ अभियानाची राज्य स्तरावर दखल
सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम राबविलेल्या “ माझे मुल माझी जबाबदारी” या उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेणेत आली आहे. येत्या जागतिक महिला दिनी सिईओ दिलीप स्वामी यांना मंत्रालयाने सह्याद्री अतिथीगृहावरील कार्यक्रमासाठी खास निमंत्रण दिले आहे.
‘माझे मुल माझे जबाबदारी’ या उपक्रमाची विशेष अंमलबजावणी केले बद्दल एकात्मिक बाल विकास व सेवा योजना विभागाच्या आयुक्त रूबल आग्रवाल यांनी पत्र देऊन सिईओ दिलीप स्वामी यांना खास निमंत्रण दिले आहे. उद्या, मंगळवारी (८ मार्च) जागतिक महिला दिनी सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचे उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात सिईओ दिलीप स्वामी यांचा गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांना देखील निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्रात कोविडची तिसरी लाट येण्याची वाट न पाहता सिईओ दिलीप स्वामी यांनी “ माझे मुल माझी जबाबदारी “ हे विशेष अभियान सुरू केले. कोरोनाच्या काळात विविघ अभियाने राबविली मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिईओ दिलीप स्वामी यांनी माझे मुल माझी जबाबदारी हे अभियान सुरू करून ९ लाख मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली. होटगी येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते या अभियानाचा शुभारंभ केला. यामध्ये दुर्धर आजारांचे पन्नास पेक्षा अधिक मुलावर उपचार व शस्त्रक्रिया करून मुलांना जीवदान देण्याचे काम केले.
माझे मुल माझी जबाबदारी या अभियानाची अंमलबजावणी प्रभावपणे केल्यामुळे कोरोनाच्या काळात मुलांना धोका पोहचू शकला नाही. याच काळात या अभियानास जोडून पारावरची शाळा सुरू करून मुलांच्या आरोग्या बरोबरच मुलांच्या शिक्षणाची देखील मोहिम पार पाडली. CEO Dilip Swamy felicitated by Chief Minister Uddhav Thackeray tomorrow
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
Covid-19 साथरोगातही रुग्णसेवा देत असताना येणाऱ्या लाटांच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेत सर्व बालकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या आरोग्य सेवेतील टीमचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टीम, कुपोषित बालकांना सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी, महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी ही मोहिम फत्ते केली. आरबीएसके मधील कर्मचारी यांनी देखील आरोग्य तपासणी मघ्ये मोठे योगदान दिले.
९ लाख मुलांची आरोग्य तपासणी केली. अति धोक्यात असलेल्या मुलांवर उपचार केलेनंतर त्यांचे पालक भेटायला आलेनंतर त्यांचे चेह-यावरील आनंद हेच आम्ही राबविलेल्या अभियानाचे यश आहे. व्यवस्थेतील सर्वांचे हे यश आहे, असे मत जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांची पूर्ण टीम, सिव्हील सर्जन ,RBSK ची पूर्ण टीम, शिक्षण विभाग , महिला व बाल कल्याण विभाग विभाग व इतर सर्वांनी घेतलेली मेहनत या मुळे हे शक्य झाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची या अभियानात मार्गदर्शन झाले, असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.
या यशाचे तुम्ही सर्वजण भागीदार असून आमचा या निमित्ताने होणाऱ्या सत्कार हा आपल्या सर्वांचा आहे. यापुढेही अशा मोहिमांमध्ये आपला जिल्हा अग्रेसर ठेवून कायम दर्जेदार सेवा जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाव्यात, असे स्वामी म्हणाले.