● संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले टायर
अकलूज : अकलूजमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी धोरणाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात अकलूजमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका उडालाय. संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवले आहेत.
माळशिरस तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथील महावितरण कंपनी कार्यालयला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकरी बांधवांनी टायर पेटवत आपला संताप व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारने चालू केलेल्या तुघलकी वसुली विरोधात व वीज बंदबाबत शेतकरी बांधव आक्रमक झालेला दिसला.
शिवरत्न बंगला अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कंपनीचे अधिकारी आणि माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळी यांची बैठक पार पडली. त्यामध्ये प्राप्त परिस्थितीचे गांभीर्य नेतेमंडळींनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले, मात्र तोडगा न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी अकलूज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. Farmers’ agitation erupts in Akluj against Mahavikas Aghadi government
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज महावितरण कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याप्रसंगी संतप्त शेतकऱ्यांनी टायर पेटविले, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देऊन आपला राग व्यक्त केला. कोरोना काळानंतर शेतकरी कसाबसा जीवन जगत असताना महावितरण कंपनीने मात्र तुघलकी कारभार करीत शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. वीज कनेक्शन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या गुराढोरांचीही पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. पिके करपू लागली आहेत. वीज बिले भरा म्हणून महावितरण कंपनी तगादा लावत असताना आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी कुठून वीज बिले भरायची हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरीही काही रक्कम भरण्यास शेतकरी बांधव तयार असताना महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र ती रक्कम घेण्यास तयार नसल्याने शेतकरी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणची बीले कशी भरायची हा प्रश्न आहे तरी काही रक्कम आम्ही भरण्यास तयार आहे आमची वीज पुरवठा पूर्ववत करा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली मात्र अधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवरून ठरलेली रक्कम भरा असाच तगादा लावला तरीही आंदोलन उग्र होईल यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ठरवू, सध्या वीज पूर्ववत करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे. त्याला आधाराची गरज आहे मात्र महावितरण कंपनी शेतकऱ्यांची अडवणूक करू पाहत आहे. सरकार शेतकऱ्यांचा अंत बघत आहे. तात्काळ यावर निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करू, माळशिरस तालुका बंद ठेवून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला जाईल”
– धैर्यशील मोहिते – पाटील
संघटन सरचिटणीस, भाजपा