● उपाध्यक्षपदी दिपक माळी
सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची तर उपाध्यक्ष पदी दिपक माळी यांची आज एकमताने निवड झाली. वडिलांनी यशाच्या शिखरावर पोहचविलेला दूध संघ रणजितसिंह हे पुन्हा त्याच जागेवर नेतील, असा विश्वास सर्वांनाच वाटू लागला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. काल सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी भवनात आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील,दिलीप माने, दीपक साळुंखे, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, बबनराव आवताडे, चंद्रकांत देशमुख या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित करण्यात आली.
पीठासीन अधिकारी कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूध संघाच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची विशेष सभा झाली. या बैठकीला रणजितसिंह शिंदे, बबनराव आवताडे, दीपक माळी, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, वैशाली शेंबडे, योगेश सोपल, निर्मला काकडे, छाया ढेकणे, राजेंद्रसिंह पाटील, हे 16 संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून रणजितसिंह शिंदे यांच्या अर्जावर सूचक म्हणून औदुंबर वाडदेकर, अनुमोदक विजय येलपले यांनी सही केली तर उपाध्यक्ष पदासाठी दीपक माळी यांचा एकमेव अर्ज आला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज गरड तर अनुमोदक बाळासाहेब माळी यांनी सही केली. अर्ज छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यामुळे भोळे यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. Ranjit Singh Shinde was elected as the President of Solapur District Milk Association because of this belief
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळीनी एकमताने या निवडी जाहीर केल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
नूतन अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ज्येष्ठ नेते दिलीपराव सोपल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप माने, दिपकआबा साळुंखे, चंद्रकांत देशमुख आदी सर्व नेतेमंडळींनी मोठ्या विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी दिली आहे. त्यास न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
जिल्हा संघात उर्जितावस्था आणण्यासाठी प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली अडचणीत असलेल्या दूध संघाला बाहेर काढण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. प्रसंगी काही कठोर निर्णय घेऊयात. मात्र शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला भाव दिला तर नक्कीच जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनात वाढ होऊन पूर्ववैभव प्राप्त होईल. खाजगी दूध संस्थांना टक्कर देत सहकारी दूध संघाला ऊर्जितावस्था आणून पूर्ववैभव प्राप्त करून देण्यास प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले.
आमदार बबनराव शिंदे जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षपदी असताना लाखो लिटरचे संकलन आणि उत्तम भाव देत संघाला भरभराटी आणली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे चेअरमन झाले आहेत. एकेकाळी आमदार शिंदे यांनी दूध संघाची धुरा सांभाळताना दररोजचे दूध संकलन 30 हजार लिटरवरून तीन लाख लिटरपर्यंत नेले होते. तीच अपेक्षा त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील नेतेमंडळींनी ठेवली आहे. नूतन अध्यक्ष ती पूर्ण करतील असा, विश्वास सर्वांना असल्याचेही सांगितले.