मोहोळ : सोलापूरहून दौंडकडे निघालेल्या मालवाहतूक रेल्वेच्या गार्डला अचानक छातीमध्ये दुखू लागल्याने मलिकपेठ रेल्वे स्टेशन वरून मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (८ मार्च) सायंकाळी ४ वाजता दरम्यान मलिकपेठ रेल्वे स्टेशन परिसर हद्दीत घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरकडून डी आर डी रेल्वे मालगाडी पुण्याकडे जात असता मलिकपेठ रेल्वे स्टेशन येथे कामानिमित्त थांबली होती. दरम्यान या मालवाहतूक रेल्वे गाडीचे गार्ड सुधाकर तुकाराम जानराव (वय 53 वर्ष रा. दौंड रेल्वे कॉलनी) यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागले. त्यानी आपल्या वॉकीटॉकी वरून संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यास माहिती सांगितली असता रेल्वे कर्मचाऱ्याने तातडीने जानराव यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत शशिकांत नागनाथ धुतरकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास ए एस आय विजय माने हे करत आहेत. Death of a guard of a freight train departing from Solapur
□ देसाई नगरात दोन गटात दगडाने हाणामारी; ३ महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर – एमआयडीसी परिसरातील देसाई नगरात घराजवळील मोकळ्या मैदानात शौचालयास बसण्याच्या कारणावरून दोन गटात दगडाने झालेल्या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या. घटना रविवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी तीन महिलांसह चोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राजश्री सुभाष गुंजेटी हिने दिलेल्या फिर्यादीवरून रुपा बंदपट्टे तिची बहीण आशा पवार आणि बबलू बंदपट्टे (सर्व रा. देसाई नगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घरासमोरच्या मोकळ्या मैदानात शौचास बसू नका, असे सांगितल्यानंतर या तिघानी फिर्यादीस शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली.
तर रूपा बबलू बंदपट्टे हिने दिलेल्या विरुध्द फिर्यादीवरून राजश्री गुंजेटी आणि सुभाष गुंजेटी (रा.देसाई नगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शौचास बसण्याचा कारणावरून राजश्री हिने दगडाने मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास हवालदार मुजावर करीत आहेत.
□ टपरी उचकटून ९ हजाराचे चप्पल चोरले
सोलापूर – शहरातील बाळीवेस येथील गोपाळराव फुटवेअर या चप्पल दुकानाच्या पाठीमागील फळ्या उचकटून नवीन चपलाचे ३० ते ३५ बॉक्स चोरल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या प्रकरणात जोडभावी पेठच्या पोलीसांनी प्रकाश शंकर शिंदे (रा.वडारगल्ली,बुधवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंदर्भात गणेश सुरेश सुरवसे (रा. जोडभावीपेठ) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. प्रकाश शिंदे याने आपल्या टपरीच्या पाठीमागील फळ्या उचकटून दुकानातील ८ हजार ५५० रुपये किमतीचे नवीन चपलाचे बॉक्स चोरून नेले असे फिर्यादीत नमूद आहे.