मुंबई : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज तोडली आहे तीसुद्धा पूर्ववत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात उसाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जात नाही. शेतीमालाचे दर गडगडले असून खासगी सावकारांकडून घेतले जाणारे कर्ज वाढू लागले आहे. दरमहा राज्यात दोन हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील सुरज जाधव या युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटले. त्यामुळे कॉंग्रेसकडे ऊर्जा खाते असतानाही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, अशी मागणी केली होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून वीज तोडणी थांबविण्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडणी थांबविणेच योग्य राहील म्हणून ऊर्जामंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडणी थांबविण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लगेचच सूचना देऊन कनेक्शन तोडणी थांबविली आहे. Postponement of power cut for next three months till harvest, BJP’s demand succeeds
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सावकारी आणि सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
मागील अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट घोषणा केली होती की, मे महिन्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोडणी केली जाणार नाही. मग त्यांनी दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वीज कापते आहे. यावर त्यांनी चर्चा करु असे सांगितले आहे. हे सरकार एवढं कोडगं आहे, सभागृहात सांगितले होते की आजची चर्चा वीज तोडणीच्या संदर्भत असेल मात्र, आज सभागृहात वेगळीच चर्च झाल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणताही संवेदना या सरकारला नसल्याचाआरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आमचा आग्रह होता की तत्काळ वीज तोडण्यचे काम थांबवा, ज्यांची वीज तोडली आहे, त्यांची वीज जोडण्याचे काम करा असे फडणवीस यावेळी म्हणाले. जोपर्यंत वीज जोडणीची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विषय लावूनच धरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
□ आमदार सुभाष देशमुखांची प्रतिक्रिया
शेतकरी विजतोडणीसंदर्भात भाजपाने अधिवेशनात पहिल्या दिवसापासून प्रश्न लावून धरला… अखेर मविआ सरकारने नमते घेत वीज कनेक्शन तोडणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी भाजपाने खोटा कळवळा न दाखवता कायम योग्य व ठाम भूमिका घेतली आहे व यापुढे देखील शेतकरी बांधवांसाठी जे योग्य त्यासाठी खंबीर भूमिका भाजपा कडून नेहमीच घेतली जाईल हे निश्चित!