पंढरपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 7 नोव्हेंबर 2021 पासून संप पुकारला होता. या संपात पंढरपूर आगारातील सर्वच कर्मचारी संपावर उतरल्याने एसटी वाहतूक बंद झालेली होती. मात्र आता पंढरपूर आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे सुरू झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंढरपूर आगारातील 70 टक्के कर्मचारी हजर झाल्याने लांब पल्ल्याची 100 टक्के बस वाहतूक व ग्रामीण भागातील अंशत: बस वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती वरीष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी दिली.
पंढरपूर आगारात 5 जानेवारी 2022 ते 08 एप्रिल 2022 या कालावधीत 20 टक्केच वाहतूक सुरु होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंढरपूर आगारातील 70 टक्के कर्मचारी हजर झाल्याने बसच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली असून, पंढरपूर- पुणे- फलटण मार्गे जाणारी साधी बस पंढरपूर बस स्थानकावरून सकाळी 6.00 ते 11.00 यावेळेत दर एक तासाला, दुपारी 2.00 ते सायंकाळी 6.00 यावेळेत दर एक तासाला सुटेल, तसेच पुणे बस स्थानाकावरुन सकाळी 7.00 ते 11.00 यावेळेत दर एक तासाला, दुपारी 2.00 ते सायंकाळी 6.00 यावेळेत दर एक तासाला निघेल.
ST traffic at Pandharpur depot fully resumed; 70 percent staff present
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंढरपूर- पुणे- फलटण मार्गे जाणारी शिवशाही बस सकाळी 5.00 वा. दुपारी 12.00, 01.00 व 3.00 वाजता सुटेल. पुणे बस स्थानकावरुन सकाळी 5.00, 6.00 वा. दुपारी 12.00 व सायंकाळी 7.00 वाजता निघेल. पंढरपूर – पुणे- करकंब मार्गे जाणारी साधी बस सकाळी 05.45, 07.15, 08.15 वाजता सुटेल. पुणे बस स्थानाकावरुन सकाळी 11.45, दुपारी 12.45,02.45 वाजता निघेल. पंढरपूर येथून सोलापूर विना थांबा दर आर्ध्या तासाला सुटेल तसेच टेभुर्णी बस दर एक तासाला सुटेल.
पंढरपूर – मुंबई रातराणी रात्री 08.15 वाजता सुटेल व मुंबई येथून सायंकाळी 07.00 निघेल. पंढरपूर-मुंबई ( स्लिपर) रात्री 10.00 वाजता सुटेल व मुंबई येथून रात्री 09.00 निघेल. त्याचबरोबर पंढरपूर आगारातून निजामाबाद, गुहागर, दापोली ,अलिबाग, हैद्राबाद, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, मेहकर, लातुर, बीड, गाणगापुर, आदी लांब पल्ल्याच्या बस सुरु करण्यात आल्या आहेत. पंढरपूर आगारातील सर्वच कर्मचारी संपावर उतरल्याने पंढरपूर आगाराचे संप कालावधीत 15 कोटी उत्पन्न बुडाले असल्याचे वरीष्ठ आगार व्यवस्थापक सुतार यांनी सांगितले.
अक्कलकोट, बार्शी, बीड, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासी बस सुरू केल्या असून लवकरच कामगारांच्या उपस्थितीनुसार स्थानिक पातळीवरील प्रवासी बस वाहतूक सुरू केली जाईल.