● निलंबनाची कारवाईसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
उत्तर सोलापूर : चुकीच्या लसीकरणामुळे सोलापुरात एका दोन महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात संबंधित आरोग्य सेविकेस निलंबित करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. मात्र आज मृत बालकाच्या पालकांना एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील प्रशांत कचोर मसलखांब (वय २ महिने) याचा चुकीच्या लसीकरणामुळे तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र डोणगाव येथे १५ सप्टेंबर २०२ङ० रोजी मृत्यू झाला होता. संबंधित डॉक्टर, आरोग्यसेविका यांच्यावर कार्यवाही करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आई,वडील,सरपंच संजय भोसले यांनी आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
प्रशांत कचोर मसलखांब नियमित लसीकरणाच्या दिवशी पेंटा, पोलिओ, रोटा अशा लसी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याला ताप आला, तापात झटके आल्यानंतर त्या बाळाला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २२ सप्टेंबर २०२० मृत्यू झाला.
संतप्त जमावाने, लसीकरणानंतर कुठलाही पाठपुरावा न करणाऱ्या संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाईची, बाळाच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाच्या नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करून मृतदेह रुग्णालयातून डोणगाव येथे आरोग्य उपकेंद्रात ठेवले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कारवाई व नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आश्वासन दिल्यानंतर जमावाने बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
One lakh financial assistance to the parents of a deceased child
https://www.facebook.com/109399567404448/posts/526059502405117/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संबंधित आरोग्यसेविका मुख्यालयी राहत नसल्याने, लसीकरणानंतर घडलेल्या घटनेदरम्यान कामावर अनधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यासंदर्भात चौकशी होऊन आरोग्यसेविकेला निलंबित करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
त्यानंतर या बालकाच्या पालकांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत मिळावी याकरीता डोणगावचे सरपंच संजय भोसले, ग्रामस्थ सारिका वाघमारे, चित्रकला बनसोडे, पूनम मसलखांब आदींनी जवळपास दीड वर्षे जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हास्तरीय पदाधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी पदाधिका-यांनी पाठपुरावा केला.
अखेर २२ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मयत बालकाच्या पालकांना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे, जनसंपर्क व प्रसिद्धी माध्यम अधिकारी रफीक शेख तसेच डोणगावचे सरपंच संजय भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.