● चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणी : अन्यथा आंदोलन
सोलापूर/पंढरपूर : कान्हापुरी (ता.पंढरपूर) येथे महावितरण कंपनीकडे कंत्राटी वायरमन असलेल्या सुनील हनुमंत कदम याने शेतकऱ्यांकडून वसूल केलेली हजारो रुपयांची वीज बिले महावितरणकडे भरलीच नाहीत. या वीज बिलांच्या रकमेचा एकूण आकडा काही लाख रुपयात जातो.
यामध्ये करकंब महावितरण ऑफिसमधील सहाय्यक अभियंता माने यांचा देखील हात असल्याचा संशय आहे. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी व्हावी व वसूल केलेली वीज बिलाची रक्कम महावितरणकडे जमा व्हावी आणि वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पावत्या मिळाव्यात, अशी मागणी येथील सरपंच प्रेम चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता पंढरपूर विभाग यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शेकडो शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन, रास्ता रोको केला जाईल, असा इशाराही निवेदनात सरपंच प्रेम चव्हाण यांनी दिला आहे.
Wireman snatches money collected from farmers in Pandharpur
https://www.facebook.com/109399567404448/posts/525825039095230/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंढरपूर विभाग महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. गवळी यांना मी दूरध्वनीवरून बोललो असून त्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, कंत्राटी कामगार सुनील कदम व जे कोणी या प्रकरणात सामील असतील त्यांना कठोर शासन व्हावे, शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या वीज बिलाची रक्कम महावितरण कंपनीकडे जमा व्हावी व शेतकऱ्यांना पावत्या देण्यात याव्यात, असा आदेश दिल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून कान्हापुरी येथे सुनील कदम हा कंत्राटी वायरमन म्हणून काम करतो आहे. कान्हापुरी गावाचा संबंध करकंब महावितरण कार्यालयाशी येत असून तेथील सहाय्यक अभियंता माने यांच्याशी शेतकऱ्यांचा सातत्याने संबंध येतो. सुनील कदम हा शेतकऱ्यांकडून हजारो-लाखो रुपयांची वीज बिल वसुली करतो. तसेच एखादा डीपी बसवण्यासाठी आठ हजार रुपये घेतो. वसूल केलेल्या वीज बिलाची कसलीही पावती नसते, जनित्र बसवणे, लिंका जोडणे, खांबावर चढून कनेक्शन जोडणे अशा सर्व प्रकारासाठी सुनील कदम हा शेतकऱ्यांकडून सक्तीने पैसे वसूल करतो.
अभियंता माने यांच्या सांगण्यावरूनच वायरमन सुनील कदम यांच्याकडे शेतकऱ्यांनी पाच हजार, सात हजार अशी वीज बिलाची रक्कम जमा केली आहे, परंतु यातील एक रुपयाचाही भरणा कार्यालयांमध्ये केलेला नाही असे सध्या दिसून आले आहे. सुनील कदम या कंत्राटी वायरमनला व करकंबचे अधिकारी माने यांना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी मागणी कान्हापुरीच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता पंढरपूर यांच्याकडे केली आहे.