नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ॲट्रोसिटी लावण्याची तक्रार देण्यात आली आहे. आपण मागासवर्गिय असल्यामुळे आपल्याला मुद्दामहून हिनवल्या जाणारी भाषा वापरली जाते, अशी तक्रार करून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ॲट्रोसिटी लावण्याची मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या वतीने त्यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांनी ही तक्रार पोलिसांकडे दिली.
नागपुरात केलेल्या वक्तव्याविरोधात युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत २० फूट खड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर १५३(ए), २९४, ५०६ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी करणारे निवेदन व लेखी तक्रार युवा स्वाभिमानी संघटनेने नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरून सध्या राज्यात रणकंदन सुरू आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फूट खड्ड्यात गाडले जाल, असे वक्तव्य केले होते.
खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. “मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. ते एससी-एसटीमध्ये येत नाहीत. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा,” असं नवनीत राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसंच 420 म्हणत संजय राऊत यांनी माझी बदनामी केली, असं राणा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
File atrocity against Sanjay Raut Navneet Rana
https://www.facebook.com/109399567404448/posts/528663938811340/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पराभूत करुन अमरावती मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासूनच शिवसेनेचे नेते संजय राऊत माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत. मी केवळ मागासवर्गीय असल्याने, चांभार जातीची आहे, त्यामुळे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझा आणि माझ्या पतीचा उल्लेख बंटी आणि बबली असा केला. समाजात माझी बदनामी करण्याच्या इराद्याने मला 420 म्हटलं.”
त्यांनी पुढे लिहिलं आहे की, “मी खारमधल्या माझ्या घरात असताना संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी पाठवून घेरण्यासाठी प्रवृत्त केलं. तसंच मला जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी ॲम्ब्युलन्सही आणली होती. असं करताना संजय राऊत यांनी एका मागासवर्गीय महिलेला घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं. जर घराबाहेर पडले तर जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही संजय राऊतांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मला आणि माझ्या पतीला जमिनीत गाडण्याची धमकी दिली.”
“संजय राऊतांनी एका मागासवर्गीय महिलेला शिवीगाळ केली. संजय राऊतांमुळे एका शिवसैनिकाने वृत्तवाहिनीवर मला चोर म्हणून संबोधलं, कारण मी चांभार जातीतून आहे,” असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.
यासाठी मी तुमच्यासमोर माझी लेखी तक्रार देत आहे,” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
□ नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता !
खासदार नवनीत राणा यांच्यावर पोलिसांवर खोटे आरोप केले म्हणून आणखी एक गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. राणा यांनी आपल्याला कोठडीत हीन वागणूक दिली, जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप पोलिसांवर केला आहे. मात्र राणा यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच पोलिसांनी राणांना चांगलीच वागणूक दिली, यासंबंधीचा एक व्हिडिओही पोलिसांनी ट्विट केला आहे.