□ न्यायालयाच्या आदेशाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव, राष्ट्रवादीचे युवा नेते तथा विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालकेंसह अधिका-यांसह चौघांवर पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गैरव्यवहारातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ भालके यांच्यावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिझेल अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगीरथ भालके हे सध्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, याच कारखान्यातील एका सभासदाने भालके यांच्या विरोधात तक्रार केली होती.
पंढरपूर तालुक्याचा राजवाडा असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी भैरवनाथ पेट्रोलीयम सरकोली येथून कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेल खरेदी करुन ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास पाटील यांनी पंढरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर नुकतीच सुनावणी झाली असून प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश खरोसे यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना सीआरपीसी 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिला आहे.
A case has been registered against Bhagirath Bhalke, chairman of Vitthal Sugar Factory and other officials
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यानुसार मंगळवारी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भगिरथ भालके, बी पी कर्पे सह भैरवनाथ पेट्रोलपंपाचे मालक, व्यवस्थापक यांचेवर भादवि कलम १२० ब, ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७अ, ३४ सह गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याच्या वतीने पेट्रोलपंप चालवण्यात येत आहे. तरीही या पंपावरुन पेट्रोल व डिझेलचा वापर न करता भैरवनाथ पेट्रोलपंपावरुन कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेलची खरेदी केली. या बदल्यात विठ्ठल कारखानेतर्फे भैरवनाथ पेट्रोल पंपाला ८ लाख ३६ लाख ५३ रुपये अडवान्स देण्यात आला. व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा विलास पाटील यांनी आरोप केला.
याची चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे मागणी न्यायालयात ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. ओंकार बुरकुल यांच्यामार्फत केली होती. न्यायालयात यावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने पोलिसांना सीआरपीसी १५६(३) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रमाणे आज मंगळवारी रात्री चेअरमन भगीरथ भालके, प्रभारी कार्यकारी संचालक बी.पी. कर्पे, पेट्रोलपंपाचे मालक व व्यवस्थापक आदी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
■ भगिरथ भालके यांची यावर प्रतिक्रिया
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जी घटना आहे ती ५-६ वर्षापूर्वीची आहे. कारखान्याचा पंप हा कन्झुमम (व्यावसायिक) आहे. या पंपाचे दर हे केंद्र शासनाच्या आदेशानुसार जास्त आहेत. यामुळे ठराव करुन खाजगी पंपावरुन डिझेल घेण्यात आले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. चौकशीतून सत्य समोर येईल. केवळ बदनामी करणेसाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी साखरेबाबत देखील पत्रकार परिषद घेवून आरोप केले होते. त्याचे काय झाले.
कन्झुम पेट्रोल पंपावर केंद्र शासनाच्या आदेशानुसारच जादा दर आहेत मग जादा दराने तेल कोण घेणार….? ऊस वाहतूक वाहनचालक व सभासद तर जादा दराने तेल कसे घेतील…? भैरवनाथ पेट्रोल पंपाने त्यावेळी ‘ना नफा ना तोटा’ या दराने तेल दिले आहे. यानंतर शासनाचा आदेश बदलल्यानंतर पुन्हा कारखान्याच्या पंपावरुन तेल घेतले आहे. आता फेब्रुवारीपासून परत शासनाचा आदेश कन्झुमम पंपासाठी जादा दर राहणार असल्याचे भगिरथ भालके (चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना) यांनी सांगितले.