सोलापूर / पुरुषोत्तम कुलकर्णी : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते तथा लातूरचे सुपुत्र रितेश देशमुख हे आज सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. ब-याच महिन्यांनी त्यांचा पदस्पर्श सोलापूरला लाभत असल्याने लातूर आणि सोलापूर यांच्या संबंधातील काही आठवणी डोळ्यापुढे उभ्या राहातात. रितेश हे कलाप्रेमी असले तर त्यांना राजकीय पुण्याई लाभली आहे. तीच त्यांची खरी ओळख. लातूरचे नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे रितेश हे सुपुत्र. विलासराव यांच्याकडून सोलापूरला दिली जाणारी ‘जकात’ आणि सोलापूरांकडून दिली जाणारी मदत यामुळे सोलापूर व लातूरच्या ऋणानुबंधाची ज्या गाठी पडल्या, त्या अजूनही सैल झालेल्या नाहीत. The ‘knots’ of debt bond matched by ‘jakati’ are still tight today!
लातूरप्रमाणे सोलापूरच्या राजकारणातही विलासरावांचा मोठा दबदबा होता. तो आदरयुक्त. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, स्व. बाबुरावअण्णा चाकोते, स्व. आनंदराव देवकते यांच्यासारख्या अनेक नेत्यांशी विलासरावांचा जिव्हाळा होता. विलासराव व सुशीलकुमार यांची जोडी म्हणजे ‘दो हंसो का जोडा’, असे समीकरणच राज्यात तयार झाले होते.
बाभळगावचा सरपंच ते मुख्यमंत्रीपदापर्यंतची विलासरावांची कारकीर्द विलक्षण ठरली. हजरजबाबी, अमोघ वक्तृत्व, संयमी, अभ्यासू अशी त्यांची ख्याती सांगता येईल. त्यांना मुख्यमंत्रीपदाची दोनदा संधी मिळाली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विलासराव आणि सुशीलकुमार यांच्यातच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस होती. सुशीलकुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास काँग्रेसजनांना होता. फटाक्यांची तयारीही झालेली होती, परंतु स्पर्धेत विलासराव विजयी झाले आणि सुशीलकुमारांसाठी आणलेले फटाके आनंदोत्सवात फोडले गेले. स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा खेळीमेळी सुरू झाली. विलासराव व सुशीलकुमार यांनी आपल्या मित्रत्वात कटुता येवू दिली नाही. सोलापूरला दिलेले योगदान
विलासरावांनी निधीच्या रुपातून सोलापूरला बरीच ‘जकात’ दिलीय. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी उजनीच्या पाणी वाटपाचे धोरण जाहीर केले. बारमाहीऐवजी आठमाही हे धोरण केल्याने दक्षिण सोलापूर व अक्कलकोटला उजनीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दक्षिण सोलापूरचे तत्कालिन आमदार आनंदराव देवकते यांनी यासाठी उठाव केला होता. देवकतेंचे राज्यस्तरावरील नेत्यांशी घनिष्ट संबंध होता. आनंदरावांचा शब्द खाली पडत नसे. धोरण जाहीर झाल्यानंतर विलासरावांनी कालव्यांच्या कामांसाठी निधी दिला, असे जाणकार सांगतात.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536989111312156/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ लोक मला ‘टाटा’ करतील
देवकते यांचे राजकीय काम कुठल्यातरी कार्यकर्त्याच्या मोटारसायकवरच व्हायचे. त्याची दखल घेऊन सोलापूरच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांना टाटा सुमो ही गाडी देण्याचा निर्धार केला. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या शानदार सोहळ्यात विलासरावांच्या हस्ते त्या गाडीची चावी देवकतेंना प्रदान केली गेली. आनंदरावांनी आता गाडीत बसूनच आपले काम करावे, असा सल्ला विलासरावांनी दिला होता. देवकते हेही हजरजबाबी. कुणाला कसे उत्तर द्यायचे यात त्यांचा हातखंडा होता. गाडीत बसून काम करू लागलो तर लोक मला ‘टाटा’ करतील, असे देवकते म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि हास्यांचे फवारे उडाले. विलासराव मुख्यमंत्री असताना आनंदराव मंत्री झाले आणि सोलापूरविषयीची आपुलकी म्हणून त्यांनी देवकतेंना लातूरचे पालकमंत्री केले.
□ सोलापूरचेही योगदान…
मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी सोलापूरने नेहमीच योगदान दिले आहे. मराठवाडा मुक्तीसंगामाच्या वेळी भारताच्या लष्करी जवानांनी सोलापुरात आपले तळ उभे केले होते. इथूनच सैन्य मराठवाड्यात जायचे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी विमानाने सोलापूरला आल्याची नोंद आहे.
या संग्रामात सोलापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाड्याला मोठे पाठबळ दिले आहे. त्याचा उल्लेख मराठवाड्यातील विचारवंत मुक्तीदिनाच्या स्मृतीदिनी नेहमीच करत असतात. विशेष म्हणजे १९९३ च्या मराठवाड्यातील प्रलंकारी भूकंपाचे संकट आल्यानंतर सोलापूरकरांनी मराठवाड्याला सर्वप्रकारची मोठी मदत केली होती.
□ ‘जकात’ दिल्याशिवाय जाणार कसा?
राज्याच्या राजकारणात व सत्तेत असताना विलासराव नेहमी सोलापूरला यायचे. रेल्वेने सोलापूरला उतरल्यानंतर ते कारने लातूरला जात असत. पंढरपूरच्या शासकीय महापूजेला जाण्यासाठी ते विमानाने सोलापूरला यायचे. विलासराव येणार म्हटल्यानंतर पत्रकारांसाठी खास बातमी असायचीच. ती न्यूज म्हणजे मसालेदार नसायची पण खुमासदार नक्कीच.
राज्यातील राजकीय व इतर प्रश्न झाले की पत्रकारमंडळी – सोलापूरच्या काही मागण्यांचे साकडे त्यांना घालत असत. तेव्हा ते नेहमी म्हणायचे. सोलापूरची ‘जकात’ दिल्याखेरीज लातूरला कसे जाता येईल? तुम्ही फक्त मागा, चेक माझ्या खिशात आहे, असे ते म्हणायचे. विलासरावांचे हे मिश्किल उद्गार ऐकल्यानंतर हास्याची खसखस पिकायची.
□ शालू पाहून भारावले!
सोलापूरचे नाट्य अभिनेते राजाभाऊ सलगर हे सुशीलकुमार यांचे जिवस्य कंठस्य मित्र. त्या दोघांनीही एकेकाळी नाटकात भूमिका केल्या होत्या. राजाभाऊ हे तसे समाजवादी व गांधी विचाराचे. काँग्रेसशी ते एकनिष्ठ. त्यांच्या अमृतमहोत्सवाला विलासराव सोलापूरला आले होते. नाटकात राजाभाऊ हे स्त्रीचे पार्ट करायचे. त्यांची ही भूमिका पाहून राजाभाऊंना बालगंधर्वांनी एक शालू दिला होता. तो शालू त्यांनी विलासरावांना दाखवला. तेव्हा विलासराव इतके भारावून गेल की, त्यांची हास्याची भावमुद्रा पाहून सोलापूरकर भारावून गेले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/536992957978438/