□ सोपल – राऊत बलाढ्य नेत्यांच्या गळेकापू स्पर्धेत बारबोलेंची एंट्री
बार्शी /सचिन अपसिंगकर :
गेली अकरा वर्षे आमदार राजेंद्र राऊत यांचे सहकारी म्हणून कार्यरत असलेल्या माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले व त्यांचे पुत्र व माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी बंडाचे निशाण फडकवत राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. लवकरच शरद पवारांच्या सभेत विश्वास बारबोलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. Vishwas Barbole will join NCP in Sharad Pawar’s meeting
गेली सहा महिने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वारे वाहत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारबोले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून सहभोजन केल्यानंतर बारबोले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची कुणकुण लागली होती. त्यानंतर राष्ट्रीय नेते शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर बारबोले यांनी अखेर राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाचे जाहीर सुतोवाच केले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांच्या शहरात होणार्या जाहीर सभेत बारबोले यांची राष्ट्रवादी एंट्री होणार आहे.
राज्याच्या राजकारणात गेले अर्धशतक प्रभाव असणार्या पवार काका-पुतण्यांचे बार्शी तालुक्यातही वलय आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांनाही शपक्ष मानले जाते. मात्र 2019 साली सोपल यांनी तालुक्यातील राजकीय अपरिहार्यता लक्षात घेत विरोधकांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर गेली तीन वर्षे बार्शीतील राष्ट्रवादीत खंबीर नेतृत्वाची मोठी पोकळी होती. आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर आमदारांची संख्या कमी झाली असली तरी सुध्दा पवार काका-पुतण्यांची मोठी पकड आहे. नुकत्याच राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला लक्षणीय यश मिळाले. त्यानंतर बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तालुक्यात राष्ट्रवादीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करत होतेच. या प्रयत्नातूनच बारबोले गटाच्या राजकीय महत्वांकाक्षेला पुन्हा फुंकर घातली गेली. सक्षम गॉडफादरच्या पाठिंब्याविना गेले दशकभर शांत राहिलेल्या बारबोले गटाने आता मरगळ झटकली. त्यांना राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही कानमंत्र देत ‘आगे बढो’ च्या सूचना दिल्याचे कळते. त्यामुळे तालुक्यात सोपल – राऊत या बलाढ्य नेत्यांच्या गळेकापू स्पर्धेत बारबोले यांनी देखील उतरण्याचा निर्णय घेतला.
बार्शी तालुक्याच्या राजकारणात आपला सवतासुभा निर्माण करणे, सोपे नाही. हे माहित असले तरी राजकारणातील पूर्वानुभव आणि जुन्या सहकार्यांची गोळाबेरीज आणि कृष्णराजच्या माध्यमातून युवकांची मोर्चेबांधणी करत बारबोले गटाने कात टाकली आहे.
तालुक्यातील नगराध्यक्षपदापासून सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदापर्यंत विविध पदे बारबोले घराण्याने भुषविली. त्यांना अनेक वेळा यश दृष्टीपथात असतानाही नशिबाने हुलकावणी दिली.
सर्व बाबी जमेच्या असल्या तरी राजकीय जिगर दाखवून धाडसी पवित्रा घेण्यास टाळाटाळ करणारे बारबोले हे आतून धुमसत आहेत. हे त्यांच्या निकटवर्तीयांना माहिती होते. मात्र तालुक्यातील सोपल – राऊत संघर्षात आपला निभाव लागणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधत बारबोले गटाने गेले दशकभर ‘वेट ऍण्ड वॉच’ ची भूमिका घेतली होती. गेली पाच वर्षे तालुक्याच्या राजकारणात मोठी संक्रमणावस्था आहे. आ. राऊत यांच्या ताब्यात तालुक्यातील सत्ता केंद्र जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर राऊत यांचे एकतर्फी वर्चस्व निर्माण होणे आपल्या राजकीय हिताच्या दृष्टीने सोयीचे नाही, हे चाणाक्ष बारबोले यांनी ओळखले आणि राऊत गटाला धक्का देण्याचा निर्णय घेतला.
□ भूमिकेबद्दल लागणार उत्सुकता
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. बारबोले गटाला आपले राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्यातरी बारबोले राष्ट्रवादीतून सर्वस्व पणाला लावून या निवडणूकांच्या माध्यमातून आपले राजकारण पुढे आणतात की माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बरोबर संधान साधून शिवसेने सोबत महाविकास आघाडीचा प्रयोग करुन राऊत विरोधकांचे एकत्रीकरण करतात, याबाबत तालुकावासियांमध्ये उत्सुकता आहे.