यंदा होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संभाव्य विजयी उमेदवारांचे धक्कादायक निकाल लागतील अशी चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यामध्ये सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार सहजगत्या निवडून येऊ शकतात, मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचे बंधन न स्वीकारता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवल्यामुळे सहाव्या जागेकरिता होणारी निवडणूक ही रंगतदार आणि चुरशीची बनली आहे. छत्रपती संभाजीराजे हे यापूर्वी भाजपतर्फे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. Political: Chhatrapati Sambhaji Raje of Trangade for the sixth seat of Rajya Sabha
२०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. राज्यातील सत्ता भाजप सोडून गेल्यामुळे पक्षामध्ये जे दोन उमेदवार हमखास निवडून येतात. त्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संधी देणे भाजप नेतृत्वाला क्रमप्राप्त आहे. यापूर्वी तिसरी जागा हमखास निवडून येत असे, मात्र यावेळी ती धोक्यात आल्यामुळे भाजपने त्यांचे उमेदवार हमखास निवडून येतील अशी तजवीज केल्यानंतर जी अतिरिक्त मते भाजपकडे उरणार आहेत ती छत्रपती संभाजीराजे यांना देण्यास भाजपची कोणतीही हरकत नाही, मात्र केवळ भाजपच्या या मतांवर निवडून येणे शक्य नाही याची जाणीव संभाजीराजेंना असल्यामुळेच त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच ते भाजपचे उमेदवार नसतील तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील असे जाहीर केले.
महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकीय पक्षांच्या पक्षीय बलाबलाचा विचार करता कोणत्याही एका पक्षाकडे सहाव्या जागेच्या विजयासाठी आवश्यक असणारी स्वबळावर ४२ मते नाहीत ही वस्तुस्थिती आहे, तथापि महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांकडे त्यांची एक हमखास निवडून येणारी जागा वगळता दुसऱ्या जागेसाठी जी अतिरिक्त मते या तिन्ही पक्षांकडे शिल्लक राहतात. त्यांची बेरीज साधारणपणे २७ ते २८ मतांच्या घरात जाते. याशिवाय महाविकास आघाडीला पाच ते सहा अपक्ष आमदारांची साथ आहे. अशी एकूण बेरीज लक्षात घेतली तर ३५ मतांपर्यंत महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार हा सहजरीत्या पोहचू शकतो, मात्र तरीदेखील त्याला निवडून येण्यासाठी आणखी सात मतांची आवश्यकता लागणार आहे.
भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपच्या स्वतःच्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी ८४ मते लागणार आहेत. उर्वरित २२ मते ही भाजपकडे सहाव्या उमेदवारासाठी अतिरिक्त असणार आहेत. भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या लक्षात घेतली तर भाजप आणि अपक्ष मिळून या दोघांचे संख्याबळ २८ च्या पुढे जात नाही.
त्यामुळे भाजप आणि अपक्षांच्या बळावरदेखील संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाणे शक्य दिसत नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या हाती शिवबंधन बांधण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल वादविवाद नक्कीच असू शकतात. तसेच ज्या संभाजीराजेंनी भाजपकडून उघडपणे सहाव्या जागेकरिता भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास नकार दिला, त्यांनी शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाकडून उमेदवारी का घ्यावी, हा त्यांच्या समर्थकांचा प्रश्न योग्यच आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/548737110137356/
मात्र १९४७ साली भारताने जेव्हा स्वातंत्र्य मिळवले तेव्हाच भारतीय संघराज्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालते. त्यामुळे स्वातंत्र्याबरोबरच राज्यघटनेनुसार देश चालविण्याची जबाबदारीदेखील यामुळे आली. त्यामुळे कोणालाही जर लोकसभा, राज्यसभा अथवा विधानसभा, विधान परिषद येथे निवडून जायचे असेल तर त्याचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळेच संभाजीराजेंना जर राज्यसभेत जायचे असेल तर ४२ मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे आणि ही ४२ मते महाराष्ट्रातील सध्या कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नसल्यामुळे तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता संभाजी राजेंसाठी राजकीय एकमत होणेदेखील संभव दिसत नसल्यामुळे जिथून विजयाची शक्यता अधिक आहे, त्यांचे पाठबळ मिळवणे हे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीराजे यांच्यासाठी आवश्यक आहे.
महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार यावेळी राज्यसभेच्या दोन जागा या शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे असणारी 30 – 35 मते ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणार आहेत. त्यामुळेच अगदी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जरी शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकला नाही तरीदेखील दुसऱ्या पसंतीच्या मतदानामध्ये शिवसेनेचा दुसरा उमेदवार हा निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात जर महाविकास आघाडी एकत्रपणे शिवसेनेबरोबर असेल तरच हे शक्य आहे. याचे कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून जरी २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असले तरीदेखील या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव, मतभेद हे अधिक प्रमाणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये ठरल्यानुसार यापूर्वी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार शिवसेनेच्या पाठबळावर निवडून गेले होते आणि त्यावेळी राष्ट्रवादीने पुढील राज्यसभा निवडणुकीत दुसरा उमेदवार शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आधीच जाहीर केले होते.
त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्याकडील अतिरिक्त मते जी शिवसेनेशिवाय अन्य कुणालाही देऊ शकत नाही. त्यामुळे जी अतिरिक्त मते शरद पवार यांनी संभाजीराजेंना देण्याचे आधी जाहीर केले होते, मात्र शरद पवार यांची ही चूक त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षात आणून दिली आणि तेव्हा कुठे राष्ट्रवादीने दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, मात्र हे करत असताना महाराष्ट्रातील मराठा समाजाचा कोणताही रोष राष्ट्रवादीवर येणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.
त्यामुळेच महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषाला शिवसेनेला सामोरे जावे लागत आहे आणि छत्रपतींना पाठिंबा न देता शिवसेनेने दुसरा उमेदवार म्हणून संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत हेदेखील मराठा समाजाच्या रोषाला बळी पडत आहेत, तथापि हे सर्व होत असताना सर्वच राजकीय पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे होते, मात्र त्याचबरोबर ज्या संभाजीराजेंनी २००९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढवली आणि त्यात त्यांना सदाशिवराव मंडलीक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, त्या संभाजीराजेंनी जर शिवबंधन बांधले असते तर राज्यसभेच्या या सहाव्या जागेकरिता जे काही त्रांगडे निर्माण झाले आहे ते उद्भवलेच नसते. त्याचबरोबर राज्यसभेच्या केवळ एका जागेकरिता एवढा मोठा खेळखंडोबा करण्याची गरजदेखील लागली नसती.
✍ ✍ ✍
● दै. सुराज्य (संपादकीय)
https://www.facebook.com/109399567404448/posts/548634176814316/