● उजनीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याने ‘उरी’ बसला घाव; पवारांच्या दहशतीमुळे जिल्हा राष्ट्रवादी गप्प
सोलापूर / अजित उंब्रजकर : सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून दक्षिण सोलापूरची खास ओळख आहे. मात्र मागील काही वर्षात काँग्रेस नेते वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेल्याने पक्षाची चांगलीच पडझड झाली. पण आता सुरेश हसापुरे यांच्या रूपाने दक्षिणमध्ये काँग्रेसला तगडा नेता मिळाला आहे. तालुक्यातील ८२ सोसायट्यांपैकी तब्बल 60 सोसायट्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. या माध्यमातून त्यांनी दक्षिण तालुक्यात काँग्रेसला चांगली बळकटी दिली आहे. The strength shown in the Society elections; Due to Suresh Hasapuren, Pawar raised the Congress in ‘Dakshin’ , Ajit Pawar Ujani statement Uri Ghaw
माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यानंतर दक्षिणमध्ये दिलीप माने हेच काँग्रेसचे नेतृत्व करत होते. याच तालुक्यातून ते आमदारही झाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. २०१९ ला ते शिवसेनेत गेले. आता ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. परंतु त्यांचा फोकस पुन्हा दक्षिण तालुक्यावर असल्याने ते संभ्रमावस्थेत आहेत.
दिलीप माने नसल्याने तालुक्यातील काँग्रेसचे नेतृत्व सुरेश हसापुरे यांच्याकडे आले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दिग्गज नेत्यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून हसापुरे यांना मानले जाते. मागील अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलेली शेतकऱ्यांची कामे, त्यांना मिळवून दिलेले कर्ज तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणलेला निधी, केलेली विकास कामे याच्या जोरावर हसापुरे यांनी सोसायटी निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ६० सोसायट्यांमध्ये त्यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केली.
या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी दक्षिणमध्ये काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणिती शिंदे यांची ताकद मिळणे गरजेचे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/550315859979481/
● अजित पवारांच्या वक्तव्याने उरी बसला घाव
अकलूज / डी. एस. गायकवाड
सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाणी प्रश्नावरून वातावरण तप्त झालेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या उरी घाव बसला असून मागील वर्षी पाच टीएमसीचा लढा संघर्षाने जिंकला असला तरी आता दोन टीएमसी पाणी परत मिळवण्यात जिल्ह्याला यश येईल का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनीच्या पाण्यावर डोळा ठेवून आपले उद्योगधंदे फुलवण्याचे काम आजपर्यंत बारामतीकरांनी केले असून ‘घडशाच पोरग सुरात रडतं’ या म्हणीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार लाकडी निंबोणी प्रकल्पासाठी नेण्यात आलेल्या पाण्याचे समर्थन करताना दिसत आहेत. ते यावरच थांबताना दिसले नाहीत तर उजनीवर नुसत्या सोलापूर जिल्ह्याचाच हक्क नाही, असा दमदाटी वजा इशाराही त्यांनी दिलेला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून उजनीचा उल्लेख केला जातो. पाण्याचे वाटपही या अगोदर झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवलंबून असणाऱ्या आष्टी शिरापूर, सीना माढा, एकरूख, मंगळवेढा, सांगोला सीना भीमा आणि दहिगाव या उपसा सिंचन योजना आजही अपूर्ण असताना इंदापूर तालुक्यातील लाकडी – निंबोणी सिंचन योजनेसाठी कोट्यावधी रुपये राज्य सरकारने देऊन सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.
याविषयी सोलापूर जिल्ह्यात संतप्त
लाट उसळलेली असतानादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सोलापूर जिल्ह्याचे खच्चीकरण करताना दिसत आहेत. या पळविलेल्या पाण्याचे त्यांनी समर्थन केले असून सोलापूर जिल्ह्यावर राजकीय दबावाचा वापर करताना ते दिसत आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प बसलेले दिसत आहेत.
दुसरीकडे उजनी पाणी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय हाणून पाडणार असल्याची भूमिका स्वीकारलेली दिसत आहे. मुळात आखणी करूनच हा डाव साधलेला दिसत आहे. पाण्याच्या माध्यमातून राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठीच त्यांनी हा खटाटोप केल्याचे आता लपून राहिलेले नाही.
□ पवारांच्या दहशतीमुळे जिल्हा राष्ट्रवादी गप्प
अजित पवारांच्या राजकीय दहशतीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी अबोल स्थितीत आहेत. अजित पवारांशी पंगा घ्यायला कोणीही तयार दिसत नाही. त्यामुळे हे पाणी जिरवण्यात पवारांना यश येते की अपयश हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.
अजित पवार बोलल्याने नेते गप्प आहेत. जिल्ह्यातील प्रत्येकाला अन्याय झाल्याची जाणीव असली तरी राजकीय सोयीसाठी राष्ट्रवादीचे नेते गप्प राहणे पसंत करताना दिसत आहेत. भरणे मामांना दोषी ठरवून राजकीय पोळी भाजण्याचा या पाठीमागे प्रयत्न होता पण अजित पवारांची उघडपणे प्रतिक्रिया आल्याने यावर सावध भूमिकेत राष्ट्रवादीचे नेते दिसत आहेत.
□ चोर तो चोर वर शिरजोर…
नेहमीच सोलापूर जिल्ह्याने पवारांवर प्रेम केले. देशाच्या राज्याच्या राजकारणात नेहमीच साथ दिली पण पवारांनी त्याची उतराई पाणी पळवून केली, अशा भावना जिल्ह्यातून व्यक्त होताना दिसत आहेत.
‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा पद्धतीने वक्तव्य बाहेर निघत असल्याने अजित पवार यांच्या विषयी खदखद व्यक्त होताना दिसत आहे. अजित पवारांनी घातलेला घाव सोलापूर जिल्ह्याच्या उराशी लागलेला आहे. ही जखम कधीही विस्मरणात जाणार नाही, यानिमित्ताने इतकेच.
https://www.facebook.com/109399567404448/posts/550311683313232/