सोलापूर : विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तीन जणांविरुद्ध सोलापूर शहर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. In view of birth anniversary, festival, festival, election, the three were sent from Solapur city – district
आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव जयंती मिरवणुका व महापालिका निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार सचिन लक्ष्मण तळभंडारे (वय-४२,रा.भैरू वस्ती), तसेच त्यांच्या टोळीतील सदस्य श्रीकांत विकास तळभंडारे व संदीप विकास तळभंडारे यांना सोलापूर शहर जिल्हा तसेच उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.
नागरिकांना शिवीगाळ करणे, दमदाटी करून मारहाण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अतिक्रमण करणे,महिला स्लज्जा वाटेल असे कृत्य करणे, अवैध व्यवसाय करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे तळभंडारे यांच्याविरुद्ध दाखल आहेत. त्यामुळे या तीन जणांना तडीपार करण्यात आल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
□ लिफ्ट दिलेल्या मोटारीतून महिलेचे ४० हजार रुपये पळविले
सोलापूर – लिफ्ट मागितलेल्या मोटारीतून प्रवास करताना एका महिला कामगाराचे ४० हजाराची रोकड पळविण्यात आली. ही घटना वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील स्वामी समर्थ सूत मील जवळ काल मंगळवारी (ता.9 ) दुपारच्या सुमारास घडली.
शोभा अरुण व्हनकडे (वय ४५ रा.सलगर वस्ती सोलापूर) या वळसंग येथील स्वामी समर्थ सूत मिल मध्ये कामाला आहेत. दुपारी चार वाजता काम सुटल्यानंतर त्या अक्कलकोट येथे जाण्यासाठी मिल जवळ थांबल्या होत्या. त्यावेळी पांढऱ्या रंगाची मोटर त्यांच्यासमोर येऊन थांबली. त्यातील महिलांनी त्यांना अक्कलकोट येथे सोडतो म्हणून वाहनात बसवून घेतले. त्यानंतर मोटारीतील तिघा अनोळखी महिलांनी त्यांच्या ब्लाउज मध्ये ठेवलेले ४० हजाराची रोकड असलेली पर्स काढून घेतले. आणि त्यांना कर्जाळ पुलाजवळ खाली उतरण्यास लावून पुढे निघून गेले. या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार जमादार पुढील तपास करीत आहेत .
□ कृषी सेवा केंद्रात चोरी
सांगोला येथील मातोश्री कृषी सेवा केंद्र या बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने १ हजार २०० रुपये आणि डीव्हीआर असा ७ हजाराचा माल पळविला. ही चोरी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तिघा चोरट्याने मिळून हा प्रकार केला. अशा आशयाची फिर्याद अभिनंदन शिवाजी साळुंखे यांनी सांगोला पोलिसात दाखल केली. हवालदार वजाळे पुढील तपास करीत आहेत.
□ सुलेरजवळगे येथे तरुणास मारहाण
सुलेरजवळगे (ता.अक्कलकोट) येथे येथील रेल्वेगेट जवळ गावात झालेल्या भांडणाची तू चर्चा का करतो. या कारणावरून काठी आणि हाताने केलेल्या मारहाणीत सोमनाथ महादेव सारणे (वय ३० रा.सुलेरजवळगे) हा तरुण जखमी झाला. ही घटना काल मंगळवारी (ता.9) सायंकाळच्या सुमारास घडली.
या प्रकरणात अक्कलकोट दक्षिणच्या पोलिसांनी आकाश गंगाधर अर्जुन आणि बसवराज उर्फ गुंडू हुळे या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार लोकरे पुढील तपास करीत आहेत.