शाळेत शिकत असताना साधारणतः सहावी किंवा सातवीमध्ये मराठी पुस्तकात दोन मेघ आणि दोन शून्य नावाचे धडे होते. लेखकांची नावे आठवत नाहीत. पण त्या दोन्ही धड्यातील संदर्भ, शिकवण आणि संदेश आजही जसेच्या तसे लक्षात आहेत. कारण तत्कालीन आमच्या शाळा मास्तरांनी, अत्यंत प्रामाणिकपणे सदर धडे आम्हाला शिकविले होते, समजून सांगितले होते आणि आम्हाला ते समजले आहेत का नाही याची खात्री करवून घेतली होती. या दोन्ही धड्यांची आज आठवण आली. त्याला निमित्त घडले महाराष्ट्रात नजीकच्या भूतकाळात झालेल्या दोन भाषणांचे. TODAY’S BLOG : Political Commentary Instead of Presidential More Actor Governor Bhagat Singh Koshyari Subodh Bhave
एक भाषण महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांचे होते आणि दुसरे कलाकार सुबोध भावे यांचे.
आता या दोन व्यक्तींची भाषणे तुलना करण्यासारखी आहेत का? दोन व्यक्ती तुलना करण्यासारख्या आहेत का? राज्यपाल कोश्यारी प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहेत. सुबोध भावे हा कोणीतरी लिहून दिलेल्या कुठल्यातरी संवादाच्या आधारावरती मोठा झालेला फालतू कलाकार आहे. असेही कोणाच्या मनात येणार असेल तर ते नाकारता येणार नाही. अशा संतप्त विचाराने काही जणांची माथी भडकतील, डोके दुखायला लागेल.
आमच्या नावाने शंखनाद करण्याचा आणि आमचे उणेदुणे काढण्याचा मोह त्यांना होईल. याला आम्ही काही करू शकत नाही. या दोन्ही भाषणात एक समानता आहे. पहिली समानता म्हणजे ही दोन्हीही भाषणे सार्वजनिक कार्यक्रमातील होती. एका ठिकाणी राज्यपाल कोश्यारी कोण्या एका रस्त्याच्या / चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने बोलत होते. कलाकार सुबोध भावे हे एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करत होते. दुसरी समानता म्हणजे दोघांचेही ते अध्यक्षीय भाषण असावे. तिसरी समानता म्हणजे या भाषणातील काही वाक्यांच्या आधार घेऊन समाज माध्यमावरती मोठा गदारोळ माजवला गेला होता. चौथी समानता म्हणजे दोघांनीही आपल्या भाषणातील ज्या संदर्भाच्या निमित्ताने जो गदारोळ उठला गेला होता, तो विचारात घेऊन सगळ्यांची , माफी मागितली होती.
अशा या दोन भाषणाच्या निमित्ताने समाज माध्यमावरती चर्चा झाली, दोषारोप झाले आणि समर्थकांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची संधी काही सोडली नाही. एक वेगळेच नाट्य या निमित्ताने महाराष्ट्रात रंगले. या विचारांनी हा लेखन प्रपंच.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्रात काही घटना आकार घेत आहेत. त्यावर बेछूटपणे, बेपर्वाईने आणि बेफिकीरपणे भाष्य होत आहे. हे भाष्य होत असताना बेजबाबदारपणाचे दर्शनही होत आहे. वास्तवतेकडे पाहण्याची दृष्टी पुरेशी स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही. भावना दुखावल्या गेल्या हाच काय तो त्यामागील एक समान धागा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला आणि इतिहासाला हे शोभेसे नाही. या दोन भाषणातील ज्या वक्तव्यामुळे समाज माध्यमावरती जो गोंधळ माजला, त्याचा थोडक्यात परामर्श आम्ही घेणार आहोत.
राज्यपालासारख्या राज्याचे प्रथम नागरिक असलेल्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून अपेक्षित नसताना त्यांनी आपल्या भाषणांमधून गुजराती आणि राजस्थानी समाजाच्या अर्थकारण संदर्भात भाष्य केले. या दोन समाजाच्या हातातील अर्थकारण मुंबईच्या बाहेर काढले तर मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी राहू शकत नाही असे वक्तव्य त्यांनी केले. सबब कोणीही मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, अशा भ्रमात राहू नये असे काहीसे राज्यपालांना सांगायचे होते. हे अध्यक्षीय भाषणापेक्षा राजकीय भाष्य अधिक होते.
सध्या महाराष्ट्रात, विशेष करून राजकारणात आणि त्यातही विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या परिवारात, शिवसेनेबाबत प्रचंड राग आहे. हे आता काही झाकून लपून राहिलेले नाही. शिवसेनेकडून सातत्याने बोलण्यात येणाऱ्या मराठी माणसाची पाठराखण अनेकांना आता खटकत चाललेली आहे. यासाठी कदाचित देशाची सूत्रे गुजरातेतील लोकांच्या हाती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील राजकारणात आम्हास स्वारस्य नाही. राज्यपाल कोश्यारी हे वयाने, अनुभवाने आणि पदाने उच्च स्थानी आहेत. कोणत्या समारंभात काय भाष्य असावे, याबाबत त्यांना मार्गदर्शन करणारी मंडळी शासनात आहेत. प्रश्न असा उपस्थित होतो की राज्यपालांनी जे भाषण केले ते त्यांचे स्वतः चे विचार होते का? त्यांना मार्गदर्शक मंडळीकडून दिले गेलेले विचार होते. अर्थात हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे. त्यावर आज भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
राज्यपालांकडून त्यांच्या पदाला न शोभणारेच भाषण झाले. यात आम्हाला विशेष काही वाटले नाही. प्रश्न पडला तो भारतीय जनता पक्षाच्या मराठी प्रांतातील पाठीराख्यांची. तसेच त्या भाषणाचे समर्थन करताना जे अकलेचे तारे तोडले त्याचा अर्थकारण कळत नसेल तर त्यात अक्कल पाजळायचे कारण नाही. गुजराती मारवाडी समाज हा अर्थकारणात माहीर आहे. आम्हाला त्यांचे कौतुक वाटते आणि अभिमानही.
अर्थकारणात ताकदीने कसे उभे राहायचे, त्याला धीराने कसे तोंड द्यायचे आणि येणाऱ्या प्रसंगातून धैर्याने कसा मार्ग काढायचा हे याच लोकांकडून शिकण्यासारखे आहे. जेथे धोका कमी, भांडवलाची सुरक्षितता आणि उत्पन्नाची हमी असा प्रांत पाहून ते गुंतवणूक करीत असतात. महाराष्ट्र त्यासाठीचा प्रांत आहे. याचा अभिमान ज्या मराठी मनाला नाही, त्यांची आम्हास कीव येते. राज्यपालांच्या माफीने हा प्रश्न तात्पुरता सुटलेला असेल. पण राज्यपालांनी माफी मागत असताना माझ्या भाषणातील संदर्भ चुकीचे घेऊन त्यावर टीका होत आहे, असे म्हटले आहे. लबाडपणा कशाला म्हणायचे असे कोणी विचारले तर हा खुलासा उदाहरण म्हणून द्यावयास हरकत नाही असाच आहे. म्हणतात ना की सुंभ जळला तरी पीळ जळत नाही तशी सध्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील आणि पाठीराख्यांची अवस्था झालेली आहे. असो.
सुबोध भावे यांनी आपल्या भाषणातून राजकारणातील परिस्थिती संदर्भात भाष्य केल्याची शक्यता दिसते आहे. कलाकारी व्यतिरिक्त, कलाकाराला कलाकार या भूमिके व्यतिरिक्त, स्वतःचे सार्वजनिक आयुष्य असते. नाही ते असलेच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. प्रत्येकाने आपल्यातील मतदार आणि करदाता या भूमिकेला जागृत ठेवले पाहिजे. त्यावर विचार करून जर कोणी काही भाष्य करत असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. सुबोध भावेंचे विचार या भूमिकेतून होते याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही.
देशातील राजकारण म्हणजे फक्त मोदी शहा आणि भाजप अशा भ्रमात अनेक मंडळी आहेत. भाजप मोदी = मोठा शून्य असे सध्या देशाचे चित्र आहे. लोकशाहीतील राजकारण फक्त दिल्लीतून चालते. अशा कल्पनेत जर कोणी असेल तर ते विचाराची धोक्याची पातळी ओलांडून जगत आहेत, असेच म्हणावे लागेल.
साध्या आपल्या सोलापूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा जरी विचार केला तरी, सुबोध भावे जे बोलले ते शंभर टक्के सत्य आहे, असेच दिसून येईल. अर्थात सुबोध भावेंचे विचार हे फक्त भारतीय जनता पक्षापुरते मर्यादित आहेत असे त्या पक्षांच्या पाठीराख्यांनी स्वतःची समजूत करून घेतली आहे. खरे तर गैरसमजूतच ती. हे भाष्य भारतीय जनता पक्षाच्या राजकारणापुरते मर्यादित नसून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबरच आपल्या देशातील लोकशाहीत कार्यरत असणाऱ्या, सर्वच राजकीय पक्षांना ते लागू होणारे आहे.
मराठीत खाई त्याला खवखव्या अशी एक म्हण आहे. सध्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीराख्यांची अशी अवस्था झालेली आहे, असे इच्छा नसताना सुध्दा सांगावेसे वाटते. सुबोध भावेने माफी मागत असताना आपले आहे ते भाषण जसेच्या तसे समाज माध्यमावरती टाकलेले आहे. ज्यांना जो अर्थ काढावयास आहे त्यांनी तो काढावा, अशी त्यांनी सगळ्यांना खुली मुभा दिलेली आहे.
यातूनही जरी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागितलेली आहे. याला मनाचा मोठेपणा म्हणतात, उत्तम शिकवण म्हणतात, सुसंस्कृत विचार म्हणतात. या साऱ्याचा अभाव राज्यपालांनी मागितलेल्या माफीतून दिसून येत आहे. आपल्या भाषणातून व्यक्त केलेल्या विचारांसंदर्भात ज्यावेळी जाहीर माफी मागण्याचा, महाराष्ट्राच्या राज्यपालांवरती जो प्रसंग आलेला आहे, तो कदाचित आजपर्यंतच्या लोकशाहीतील आणि देशभरांच्या राज्यपालांच्या वागणुकीतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही.
आम्ही व्यक्त केलेल्या विचारातून कोणा भारतीय जनता पक्षांच्या पाठीराख्यांच्या मनात आमच्याबद्दल अनादर निर्माण झाला, त्यांना आमचा राग आला आणि आमच्या बद्दल मनात अविश्वास वाटू लागला तर, त्यासाठी आम्ही काही करू शकत नाही. आम्ही विचाराच्या बैठकीशी आणि देवी सरस्वतीच्या लेखणीशी प्रामाणिक आहोत एवढेच सांगणे.
📝 📝
□ श्रीनिवास वैद्य, सोलापूर