फार पूर्वीपासून आपल्या विचारांची जडण घडण अशी झाली आहे की, स्त्री आणि परावलंबित्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे आपल्याला भासते. संसार रूपी रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत असे आपण वारंवार म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या पुरुष रूपी चाकाला महत्त्व दिले गेले. घरात राबणाऱ्या स्त्री रूपी चाकाचे अस्तित्वच दुर्लक्षित राहिले. Women and Dependence: Importance of Masculine Wheel, Existence of Feminine Wheel Neglected Blog
आपल्या आयुष्यात होत असणाऱ्या प्रत्येक तुलनेत ‘ आर्थिक स्वावलंबन’ या संकल्पनेला जेव्हा प्राधान्य दिले गेले तेव्हा त्या तुलनेत स्त्रिया सर्वाधिक परावलंबी ठरल्या. घरात ज्याच्या हाती आर्थिक व्यवहार असेल त्याच्याच हातात घरातील निर्णय घेण्याची सत्ता दिली आणि घरासाठी राबणारी स्त्री तिच्याही नकळत परावलंबी होत गेली.
लग्न म्हणजे संसारात एकाने आर्थिक बाजू सांभाळली तर दुसऱ्याने कौटुंबिक बाजू सांभाळायची असा साधा सरळ व्यवहार होता. आजही ज्या घरातील प्रत्येक निर्णय सामंजस्याने एकमेकांच्या संमतीने घेतला जातो त्या घरातील स्त्री कधीच परावलंबी होत नाही. संसारात वर्चस्व स्थापित करण्याची भावना निर्माण झाली तेव्हाच सामंजस्य लोप पाऊण पैसा म्हणजेच सत्ता हे समीकरण प्रचलित झाले असावे. खरे पाहता स्त्री घरी असे म्हणूनच पुरुष निश्चित मनाने घराबाहेर पडून अर्थार्जन करू शकत होता.
शारीरिक बलाचा वापर होणाऱ्या कामात स्त्री पुरुषावर अवलंबून असे तर कोमल स्वरूपाच्या कामात पुरुष स्त्रियांवर अवलंबून होते. मुळात दोन्ही कामांचे स्वरूप भिन्न असल्याने त्या कामांच्या तुलनेतील निकषांवर एकाने दुसऱ्याला परावलंबी ठरविणे तात्त्विक दृष्ट्या योग्य नाही. पुरुष आणि स्त्री एकमेकांना पूरक मानले जात होते तोपर्यंत स्त्रीच्या बाबतीत ‘परावलंबी’ हा शब्द चलनात नव्हता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आयुष्यात जेव्हा ‘पैसा’ मोठा झाला तेव्हा कमावत्या पुरुषाची बायको परावलंबी झाली आणि कमावत्या स्त्रीचा नवरा परावलंबी मानला गेला. ज्या घरात स्त्री पुरुष दोघेही कमावते झाले तिथेही आर्थिक स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारी स्त्री मात्र छोटे मोठे निर्णय घेताना बऱ्याच अंशी परावलंबीच राहिली होती. निर्णय घेण्याच्या दृष्टीने स्वावलंबी असणारी स्त्री जर कमावती नसेल तर सामाजिक दृष्ट्या तिला परावलंबी मानण्यात आले.
आदिवासी जमातीत स्त्रिया शिकारीला जात नाहीत तरी त्यांच्या समाजात त्यांना परावलंबी मानले जात नाही. कारण ते निसर्ग नियम मानतात. स्त्री आणि पुरुष शारीरिक दृष्ट्या भिन्न असल्याने त्यांच्या | योग्यतेनुसार कामांची विभागणी केलेली असते. स्त्री शारीरिक दृष्ट्या कोमल असल्याने बळकट पुरुषाने शिकार करून / जंगलात फिरून आणलेल्या साहित्याची स्वच्छता, साठवणूक करणे. कातडी वाळविणे, त्यांची वस्त्रे बनवणे, पदार्थांना शिजवणे, सगळ्यांना खाऊ घालणे, मुलांचा सांभाळ करणे अशी कामे स्त्रिया करतात. तिच्या कामाचे स्वरूप जरी कोमल असले तरी त्यांचे महत्त्व नाकारले जात नाही.
निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना परस्पर पूरक बनविले आहे. तेव्हा त्यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आपण उच्च शिक्षित समाज असूनही स्त्री पुरुषांची सर्रास तुलना करतो. स्त्री पुरुषांच्या शारीरिक तुलनेत स्त्री परावलंबी ठरते. यावरच न थांबता आपण दोन स्त्रियांची वर वर तुलना करत एकीला परावलंबी घोषित करतो.
कमावत्या स्त्रीच्या तुलनेत घर सांभाळणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत कुटुंबाच्या मताला प्राधान्य देणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःची कामे स्वतः करणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत कामात दुसऱ्यांची मदत घेणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःच्या आवडीचे कपडे परिधान करणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या आवडीचे कपडे परिधान करणारी स्त्री परावलंबी ठरते. गाडी चालविता येणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत गाडी चालविता न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वयंपाक येणाऱ्या स्त्रीच्या दृष्टीने स्वयंपाक न येणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनविणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत इतरांच्या आवडीनिवडी सांभाळणारी स्त्री परावलंबी ठरते. स्वतःसाठीचा खास वेळ राखून ठेवणाऱ्या स्त्रीच्या तुलनेत संसारात गुरफटलेली स्त्री परावलंबी ठरते. खंबीर, कणखर स्त्रीच्या तुलनेत अडचणीत सापडलेली दुबळी स्त्री परावलंबी ठरते. अशा अनेक निरर्थक तुलना आपल्या आजूबाजूला सतत होत असतात म्हणूनच जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक स्त्री कोणत्यातरी एका क्षणी परावलंबी ठरत असते.
📝 📝
○ अंजली धसके