सोलापूर – चुलत बहिणीच्या शेतातील वाद आमच्या संमती शिवाय परस्पर का मिटवला या कारणावरून दिवसा बंदुकीतून गोळ्या झाडून चुलत भावाचा खून केल्याच्या आरोपावरून सोलापूर न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. Gunshot murder in Solapur; Court sentences four to life imprisonment
बाप्पू उर्फ शरणाप्पा शिवानंद दिंडोरे (वय २८) त्याचे वडील शिवानंद महादेव दिंडोरे (वय ५४), दोन चुलते बसवराज महादेव दिंडोरे (वय ४९) आणि सिद्धाराम महादेव दिंडोरे (वय ४८ सर्व रा. आहेरवाडी ता.दक्षिण सोलापूर) असे जन्मठेप ठोठावलेल्या चौघांची नावे आहेत. प्रत्येकी २ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा एन.पांढरे यांनी आज सोमवारी ठोठावली. मयताच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये आरोपींनी द्यावे, असेही निकालात नमूद केले आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहेरवाडी (ता.दक्षिण सोलापूर) येथील दिंडोरे वस्तीत मयत मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या कुटूंबियासोबत राहण्यास होते. त्यांची बहीण भागीरथी बाके यांच्या जमिनीचा वाद होता. तो वाद त्यांच्या सख्या भावानी परस्पर मिटविला होता. त्यामुळे भावकीतील आरोपी त्यांच्यावर चिडून होते.
घटनेच्या दिवशी म्हणजेच १९ मार्च २०१७ रोजी दुपारच्या सुमारास मल्लिकार्जुन दिंडोरे हे आपल्या वस्तीवर आई,भाऊ आणि बहीण भागिरथी यांच्या सोबत बसले होते. त्यावेळी या चौघे आरोपी शस्त्रानिशी घटनास्थळी आले. आणि त्यांनी भागीरथी बाके हिच्या जमिनीचा वाद तुम्ही परस्पर का मिटविला? आता तुम्हाला ठारच मारतो असे म्हणत बापू उर्फ शरणप्पा दिंडोरे याने सोबत आणलेल्या १२ बोअरच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तर अन्य तिघेजण त्याला चिथावणी देत होते. बंदुकीतील गोळी मल्लिकार्जुन धोंडप्पा दिंडोरे (वय ४२) यांना लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ते २१ मार्च रोजी मयत झाले.
या घटनेची फिर्याद मयत मल्लिकार्जुन यांचे मोठे बंधू मधुकर धोंडप्पा दिंडोरे यांनी वळसंग पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी चौघांविरुद्ध खून आणि शस्त्र अधिनियमाचा गुन्हा दाखल आरोपींना अटक केली. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र न्यायालयास सादर केले होते.
या खटल्यात सरकार तर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी ६ साक्षीदार फुटले. मूळ फिर्यादीची साक्ष, शवविच्छेदनाचा अहवाल, बॅलेस्टिक एक्सपोर्टची साक्ष आणि सरकारी पक्षाने मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲड. प्रशांत देशमुख, ॲड व्ही.डी.फताटे, ॲड लोंढेपाटील, आणि ॲड रिसबुड यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार शितल साळवे यांनी सहकार्य केले.