मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचा मुद्दा चर्चेत आला. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलचे धारेवर धरले. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. Devendra Fadnavis decided to train drivers of MLAs after Vinayak Mete’s accident
परिवहन विभागाच्या पुढाकाराने सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आता राज्यातील सर्व आमदारांच्या येत्या बुधवारी (ता. 24) आमदारांच्या वाहनचालकांना मुंबई येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आणि महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य वाढले. या आधीही देशाने आणि राज्यानेही काही नेते अशाच अपघातात गमावले आहेत. मेटे यांच्या अपघातानंतर राज्यामधील नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याबाबत भाष्य केलं होतं. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांना डुलकी येऊन अपघात घडू शकतात. मेटे यांच्या अपघातानंतर आता सरकार देखील सतर्क झालं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अनेक आमदार अधिवेशनासाठी किंवा मंत्रालयात येण्यासाठी आपल्या गाडीने मुंबईच्या दिशेने येत असतात. रात्रीच्या वेळी प्रवास करत सकाळपर्यंत मुंबई गाठतात. मात्र असा रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरु शकतो. यामुळं सरकारनं आता आमदारांच्या चालकांना याबाबत प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे.
विनायक मेटेंचा अपघाता झाल्यावर त्यांच्या चालकाने पोलिसांना फोन केला होता. त्याने 112 या इमर्जन्सी नंबरवर फोन केला. मात्र त्याला अपघाताचे योग्य लोकेशन सांगता आले नाही. त्याने चुकीचे लोकेशन सांगितल्याने योग्य लोकेशन शोधून तिथपर्यंत पोहोचायला पोलिसांना उशीर झाला. त्यामुळेच येत्या काही दिवसात 112 या इमर्जन्सी नंबरवर फोन केल्यास त्या व्यक्तीचे लोकेशनही पोलिसांना कळेल अशी सिस्टिम बसवण्यात येईल. त्याबद्दल लवकरच कार्यवाही आणि अंमलबजावणी करू, असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.
याचबरोबर मेटे यांच्या अपघातासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करणं गरजेचं आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कालबाह्य यंत्रणेसंदर्भात भाष्य केलं. याचबरोबर मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम लावण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. तसंच ट्रेलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.