सोलापूर : महापालिकेनी भाडेतत्वावर दिलेल्या शहरातील १७३ गाळे धारकांनी साधारण ५० लाख रुपये भाडे थकविले आहे. या थकीत भाड्यापोटी महापालिकेने गाळ्यांना सील ठोकली. कारवाई मोहीमेंतर्गत ११३ जणांनी थकीत पैशाची भरणा केली आहे. Action for arrears of rent of municipal maternity hospital Balives Solapur
शहरात महापालिकेच्या मालकीचे ६५३ मिनी तर ६२५ मेजर असे एकूण १ हजार २७८ गाळे आहेत. हे गाळे २९ वर्ष ११ महिन्यांच्या करारावर कवडीमोल किमतीवर व्यापाऱ्यांना भाडेतत्वावर दिली गेली आहेत. या सर्वच गाळ्यांची मुदत संपूनही व्यापारी तेथेच ठाण मांडून आहेत. या गाळ्यांच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाकाठी रेडीरेकनर दरानुसार किमान २५ कोटींचे महसूल मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ४ ते ५ कोटी रुपयेच महापालिकेला मिळते.
या गाळ्यांवर अनेकांनी आपल्या मालकी हक्क दाखवित ई-लिलावाला विरोध दर्शविला. शासनाने यापूर्वी रेडीरेकनर अथवा बाजारभाव या दोन्हीमध्ये अधिक असलेले दर गाळ्यांना आकारणी करावी, असे आदेश दिले होते. २०२२ – २३ या वर्षात शासनाकडून गाळ्यांबाबत कोणतेच निर्देश प्राप्त न झाल्याने हा भाडेवाढीचा विषयाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
जुन्या पध्दतीने सुरू असलेली भाडेदेखील व्यापाऱ्यांनी भरली नव्हती. अशा १७३ व्यापाऱ्यांची यादी काढून गाळे सीलची कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत ११३ जणांनी थकीत भाडे भरले आहे तर उर्वरित ६० जणांचे गाळे सील करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सुरू आहे.
महापालिकेचे गाळे भाडे थकविलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. गाळे सील केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी थकीत पैसे भरले अशा दुकानांची सील काढण्यात आली आहे. तर उर्वरित गाळ्यांची सील कायम ठेवली गेली आहे. अजूनही यादी काढण्याचे काम सुरू असून सप्टेंबरपासून ही कारवाई मोहीम कडक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बाळवेस येथील बीओटी प्रकल्प दीड महिन्यात होणार पूर्ण !
– तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्रसूतीगृह तर चौथ्या मजल्यावर राहणार खाजगी हॉस्पिटल
सोलापूर : बाळीवेस येथील महापालिकेअंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये महापालिकेला दोन मजले ताब्यात मिळणार आहेत. त्याठिकाणी महापालिका प्रसूतीगृह आणि खाजगी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या बाळवेस येथेपूर्वीच्या राजूबाई मॅटरनिटी होम या ठिकाणी बीओटी प्रकल्प अकरा वर्ष झाले रखडले होते. सन 2011 पासून हे काम प्रलंबित होते. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प प्रलंबित होता. अखेर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत हा प्रकल्प मार्गी लावला. येत्या दीड महिन्यात या बीओटी प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे. मंत्रीचंडक कन्स्ट्रक्शन यांच्याकडे हा प्रकल्प दिला आहे.
बांधा – वापरा- हस्तांतरित करा ( बीओटी ) या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या बीओटी प्रकल्प अंतर्गत एकूण 3 हजार 599 चौरस मीटर बांधकाम करण्यात येत आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या इमारतीतील तिसरा व चौथा मजला महापालिकेच्या ताब्यात मिळणार आहे. तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्रसुती गृह सुरू करण्यात येईल तर चौथ्या मजल्यावर खाजगी हॉस्पिटलसाठी जागा लिलावाद्वारे महापालिका भाड्याने देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या ताब्यात येणारा तिसरा मजला हा 295 चौरस मीटर क्षेत्रफळ तर चौथ्या मजल्याचे 731 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे बरीच वर्ष रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागला. येत्या दीड महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार असून या ठिकाणी महापालिकेचे प्रसूती गृह तसेच खाजगी हॉस्पिटल सुविधा नागरिकांना मिळू शकणार आहे.