श्रीपूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशपातळावरचा पुरस्कार देवून मुंबईत सन्मान करण्यात आला. यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित हा सन्मान झाला. Pandurang Sugar Factory of Solapur honored in Mumbai by giving national level award
को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा बेस्ट को जनरेशन प्लांट हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खाताल, केंद्रिय सचिव दिनेश जगदाळे, को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते आज शनिवारी (ता. 27) मुंबई येथे प्रदान केला.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात पहिल्यांदा को-जनरेशन प्लॅट उभारून सहकारी साखर कारखान्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. को – जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीची विचार करुन को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ६७ के.जी. बॉयलरच्या आतील को- जनरेशनसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पुरस्कार देताना कारखान्याने को जनरेशन मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करून कारखान्याचे कौतुक केले. यावेळी विश्वजीत कदम को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताल, केंद्रीय सचिव दिलीप जगदाळे आदी उपस्थित होते .
हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक तानाजी वाघमोडे, कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी आदींनी स्वीकारला.
को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया यांनी हंगाम २०१८—१९ ते २०२०—२१ या तीन वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर ६७ kg च्या आतील बॉयलर असणाऱ्या को-जनरेशन प्रकल्पास देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोकृष्ट पुरस्कार दिला आहे. त्यात श्री पांडुरंग कारखान्याने कमीत कमी बगॅसमध्ये जास्तीत जास्त विज निर्मीती, अंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले कार्बन क्रेडीट, कमी उत्पादन खर्च, कारखान्यास मिळालेले ISO सर्टीफिकेट व कारखान्याचे असलेल्या सुरक्षा योजना, कारखान्याचा सौर उर्जा प्रकल्प, कमीत कमी पाणी वापर, पाण्याचा पुर्णंवापर, पाचटाचा वापर करुन विज निर्मीती, को- जनरेशन प्लँटची क्षमता वापर या सर्व बाबीचा विचार करुन पुरस्कार देण्यात आला आहे.
कारखान्यास आज पर्यंत ४१ पुरस्कार मिळाले असून सदरचे पुरस्कार कारखान्याचे चेअरमन मा आ प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी यांनी केलेल्या सर्वोच्च कामगिरीच्या जोरावर मिळाले असून यापुढेही कारखाना अशाच प्रकारे सर्वोच्च कामगिरी करेल, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
कारखान्याचे कोजन मॅनेजर सचिन विभुते यांना बेस्ट कोजन मॅनेजर हा पुरस्कार, समीर सय्यद यांनाही बेस्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर म्हणून पुरस्कार , व सत्यवान जाधव यांना बेस्ट डी एम प्लांट मॅनेजर म्हणून पुरस्कार याप्रमाणे कारखान्यास को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया कडून पुरस्कार असे आज एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.