सोलापूर/ अक्कलकोट : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कल्याणशेट्टी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. सध्या राज्याच्या मंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव आघाडीवर घेतले जात होते. पण त्यांच्या गळ्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे. MLA Sachin Kalyanshetty Solapur BJP new district president Akkalkot
भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष, त्यानंतर आमदार आणि आता थेट जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.भाजपामधील युवा आमदाराला जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आमदार कल्याणशेट्टी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. आमदार कल्याणशेट्टी यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन कल्याणशेट्टी यांचा राजकीय प्रवास अतिशय भरारी घेणारा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे ते समजले जातात. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही ते निकटवर्तीय मानले जातात. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावचे सरपंच, भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष, त्यानंतर आमदार आणि आता थेट जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. गोवा निवडणुकीत त्यांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून काम केले होते. ज्या उमेदवाराचा प्रचार केला तो उमेदवारही निवडून आला. विजयी उमेदवाराने पहिला फोन सचिन कल्याणशेट्टी यांना केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजपाने अखेर जिल्ह्यातील आमदार असलेल्या आपल्या मूळच्या कार्यकर्त्याला पसंती दिली आहे. त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, सोलापूर शासकीय विश्रामगृहावर येत्या दोन दिवसांत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अक्कलकोटमधील दिवंगत बाबासाहेब तानवडे, बलभीम शिंदे, आणि शिवशरण दारफळे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. दारफळे यांनी तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती, असे जुने जाणकार सांगतात.
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचे आरोप केले होते. तसेच, त्यांचा बेडरुमधील व्हिडिओही सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. पक्षाची बदनामी नको म्हणून देशमुख यांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा सुपूर्द केला. लगेच भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता. तेव्हापासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये विजयराज डोंगरे, धैर्यशील मोहिते पाटील, संतोष पाटील, शिवाजी कांबळे यांचा समावेश होता.